अडाण प्रकल्पावर दिलेआपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण अधिकारी, कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील अनेकांची उपस्थिती



अडाण प्रकल्पावर दिले

आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण

अधिकारी, कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील अनेकांची उपस्थिती

        वाशिम, दि. 20 (जिमाका) : राष्ट्रीय आपत्ती मोचन दल पुणे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर, व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कारंजाच्या वतीने एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन पूर व भूकंप याबाबतचे प्रशिक्षण आज 20 जून रोजी कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प येथे देण्यात आले.

          या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय आपत्ती मोचन दल पुणे येथील निरीक्षक आर.जे.यादव, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूरचे निरीक्षक विश्वास बादल, कारंजाचे पोलीस निरीक्षक नागेश मोहोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, नायब तहसीलदार सविता डांगे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. मोरे, श्री. बोंदरे, श्री. उसेंडी, सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्याम सवाई, संत गाडगेबाबा शोध व बचाव पथक प्रमुख दिपक सदाफळे, एन. एस. एस. शोध व बचाव पथकाचे आदित्य इंगोले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

           आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. भगत यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, पुर, वीज पडली, भूकंप, हवामान बदलामुळे विविध आपत्तींचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारीत आपत्ती व्यवस्थापन केले जाते.

           आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक निरीक्षक श्री. यादव यांनी प्रशिक्षण देताना म्हणाले की, मानवी जीवनात येणाऱ्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करून त्याचे नियोजन व व्यवस्थापन केले जाते. अचानक आलेल्या आपत्तीचा सामना करीत आपण त्यावर प्रथमोपचार कसा केला पाहिजे. पूर, भूकंप, ह्दय विकाराचा झटका, रस्ते अपघात, सर्पदंश, त्सुनामी, आग, वीज, एखादा व्यक्ती पुरात, तलावात, विहिरीमध्ये पडला असेल तर त्याला बाहेर कसे काढले पाहिजे आणि त्याला प्रथमोपचार कशा पद्धतीने दिला पाहिजे. अशा अनेक मुद्दयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी निरीक्षक श्री. बादल, श्री. सदाफळे व श्री. सवाई यांनी देखील मार्गदर्शन केले.

           राष्ट्रीय आपत्ती मोचन दल पुणे यांनी बोटीने शोध व बचाव कसा करावा. याबाबत बोट प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच साहित्याची माहिती दिली. समारोपीय कार्यक्रमाला कारंजाचे उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे यांनी देखील मार्गदर्शन केले.

          जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम व तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कारंजा यांच्या वतीने आयोजित केलेल्या या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तहसील कार्यालय कारंजा, मंगरूळपीर, मानोरा येथील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नदीकाठावरील गावचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, स्वयंसेवी संस्था, सर्वधर्म आपत्कालीन संस्था, संत गाडगे बाबा शोध व बचाव पथक पिंजर, श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय शोध व बचाव पथकाचे स्वयंसेवक, पट्टीचे पोहणारे व्यक्ती यांची उपस्थिती होती.

          कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कारंजाचे तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी श्री. कटके, अव्वल कारकून श्री. सरोदे, तलाठी श्री. राठोड, श्री. खिराडे, श्री. कांबळे व तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार शाहू भगत यांनी मानले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे