कोतवाल पदभरती निवड समिती गठीत कोतवालांच्या पदभरतीचा कालबध्द कार्यक्रम जाहिर




कोतवाल पदभरती निवड समिती गठीत

कोतवालांच्या पदभरतीचा कालबध्द कार्यक्रम जाहिर

       वाशिम, दि. 16 (जिमाका) :  राज्य शासनाने कोतवाल पदभरती संदर्भात सुधारीत नियमास मान्यता दिली आहे. त्यामध्ये सुधारीत तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहे. शासन निर्णयातील सुधारीत नियम व मार्गदर्शक तत्वे देखील निश्चित केली आहे. कोतवाल पदभरती सन 2023 करीता निवड समिती गठीत केली आहे. संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून तहसिलदार हे सदस्य सचिव असतील. तालुकास्तरावरील गट-अ किंवा गट-ब दर्जाचा मागासवर्गीय अधिकारी आणि तालुकास्तरावरील गट-अ किंवा गट-ब दर्जाची महिला अधिकारी हे या समितीचे सदस्य असतील.

          कोतवाल पदासाठी उमेदवारांची किमान शैक्षणिक अर्हता इयत्ता 4 थी पास असावी. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षादरम्यान असावे. कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती असेल. कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे 50 प्रश्न असतील. त्यानुसार लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांने प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवड सुची तयार करुन निवडसुचीतील पात्र उमेदवारांचे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. नामनिर्देशनाव्दारे पदभरती करतांना बिंदु नामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या प्रचलित शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यात येईल व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करावे लागेल.

          जिल्हयातील तहसिलदार यांच्या आस्थापनेवरील कोतवालांची रिक्त पदे भरण्यासाठी पुढीलप्रमाणे कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. 15 जून 2023- बिंदु नामावली अद्यावत करुन आयुक्त, मागासवर्ग कक्ष, अमरावती यांचेकडून मंजूर करुन घेणे व अहवाल सादर करणे. 19 जून 2023- तहसिलदारांनी जाहिरनामा प्रसिध्द करणे. 30 जून 2023 रोजी सायंकाळी 6.15 वाजतपर्यंत पदभरतीबाबत अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख. 7 जुलै- अर्जाची छाननी करुन पात्र/ अपात्र उमेदवारांची यादी गावनिहाय तयार करुन प्रसिध्द करणे. 12 जुलै रोजी दुपारी 4 वाजतापर्यंत आक्षेप नोंदविणे. 17 जुलै रोजी आक्षेप निकाली काढून परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व उमेदवारांना प्रवेशपत्र पाठविणे. 30 जुलै 2023 रोजी लेखी परीक्षा. 4 ऑगस्ट रोजी उत्तर पत्रिकांची तपासणी. 8 ऑगस्ट रोजी निकाल निवड यादी प्रसिध्दी करणे. 10 ऑगस्ट रोजी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त आदेश देणे आणि 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास कोतवाल पदभरतीबाबतचा अंतिम अहवाल सादर करण्यात येईल.      

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे