शासन आपल्या दारी’ ..कारंजा तालुक्यात यंत्रणा पोहचल्या 12 हजार कुटूंबांपर्यंत...विविध योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांकडून 5 हजार अर्ज प्राप्त


‘शासन आपल्या दारी’

कारंजा तालुक्यात यंत्रणा पोहचल्या 12 हजार कुटूंबांपर्यंत

विविध योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांकडून 5 हजार अर्ज प्राप्त

       वाशिम, दि. 19 (जिमाका) :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘ शासन आपल्या दारी ’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. जिल्हयात तर या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी त्यांच्या विभागाशी संबंधित योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे, यासाठी लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे. या उपक्रमाचा हर घर दस्तक अभियानाच्या माध्यमातून यंत्रणा लाभार्थ्यांच्या घरोघरी पोहचत आहे. कारंजा तालुक्यातील यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी आतापर्यंत तालुक्यातील 12 हजार 100 कुटूंबांपर्यंत पोहचले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांचे 5 हजार 101 अर्ज प्राप्त झाले आहे.

          लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुकापातळीवर संबंधित कार्यालयात जावून योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करावा लागायचा. एकदा नाहीतर अनेकदा लाभार्थ्याला संबंधित कार्यालयात जावे लागायचे. मात्र शासन आपल्या दारी या उपक्रमामुळे यंत्रणाच आता थेट लाभार्थ्यांच्या दारी पोहचून योजनांची माहिती देवून विविध योजनांचे अर्ज भरुन घेवून त्यांना लाभ देत आहे.

          कारंजा तालुक्यात एकूण 91 ग्रामपंचायती आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत 34 हजार 538 कुटूंबे आहेत. त्यापैकी 18 जूनपर्यंत यंत्रणा 12 हजार 100 कुटूंबापर्यंत पोहचल्या आहेत. कुटूंबाला भेटून त्यांना कोणत्या योजनेचा लाभ पाहिजे आहे, याची विचारणा करुन जागेवरच लाभार्थ्यांकडून योजनेच्या लाभासाठी अर्ज भरुन घेत आहे. सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रेसुध्दा लाभार्थ्यांकडून एकत्र करत आहे.

          8 ते 18 जून या कालावधीत कारंजा तालुक्यात कृषी विभागाने 1 हजार 194 अर्ज, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने 175, पंचायत समितीने 1 हजार 377, महसूल विभागाने 291, आरोग्य विभागने 1 हजार 990, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाने 9, शिक्षण विभागाने 15, पशुसंवर्धन विभागाने 12, पाणी पुरवठा विभागाने 10, वीज वितरण कंपनीने 6, वन विभागाने 7 आणि इतर विभागाने 15 असे एकूण 5 हजार 101 अर्ज लाभार्थ्यांकडून विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी भरुन घेतले आहे.

         तालुक्यातील कोणत्याही योजनेचा पात्र लाभार्थी हा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांचे अधिकारी घेत आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत मिळणार असल्याने लाभार्थ्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे