सोयाबीन पिकाची काळजीपूर्वक पेरणी करा कृषी विभागाचे आवाहन




सोयाबीन पिकाची काळजीपूर्वक पेरणी करा

कृषी विभागाचे आवाहन

      वाशिम, दि. 09 (जिमाका) : खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्हयात एकूण 4 लक्ष 4 हजार 90 8 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकाचे पेरणीचे नियोजन केले आहे. त्यापैकी 3 लक्ष 4 हजार 80 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाच्या पेरणीचे नियोजन आहे. जवळपास 75 टक्के क्षेत्र सोयाबीन पिकाचे असल्याने शेतकरी बांधवानी काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पेरणीची घाई न करता ७५ ते १०० मी.मी. पाऊस पडल्यावरच सोयाबीन पिकाची पेरणी करावी आणी चांगले उत्पादन घेण्यासाठी खालीलप्रमाणे अस्टसूत्री चा अवलंब करावा.

         घरगुती पद्धतीने तयार केलेले सोयाबीन बियाणे वापरताना स्पायरल सेपरेटरच्या सहाय्याने बियाण्याची प्रतवारी करावी. पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी. पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करावी, बिजप्रक्रिया करताना सुरवातीला बुरशीनाशक किटकनाशक आणि जैविक अशाक्रमाने बिजप्रक्रिया करावी. तसेच खोडमाशी नियंत्रणासाठी थायोमेथोझम ३० टक्के एफएस ६ मिलि प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे. दहा वर्षाच्या आतील वाणाची निवड करावी. तसेच पाऊस उशिराने झाल्यास लवकर परिपक्व होणारे वाण जसे जेएस- ९५६०, जेएस-२०३४, पीडीकेव्ही अंबा आणि जेएस 9305 या वाणाची निवड करावी. पेरणी करत असताना ६ इंच जमीन ओली झाल्यानंतरच ३ ते ५ सेंटीमीटर खोलीवरच बियाणे पेरणी करावी. पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करून पेरणी करावी. बहुपीक पेरणी यंत्राचा वापर केल्यास २६ किलो प्रति एकर बियाणे वापरावे व बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्यास २२ किलो प्रति एकर बियाणे वापरावे आणि टोकन पद्धतीने पेरणी करावयाची असल्यास १४ ते १६ किलो प्रति एकर बियाणे वापरावे. सोयाबीन पिकासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी शिफारस केल्यानुसार सोयाबीन पिकासाठी प्रति एकर १२ किलो नत्र, ३० किलो स्फुरद आणि १२ किलो पालाश अशी खत मात्रा द्यावी.

         तननाशक वापर- फ्लूमीऑझीन ५० टक्के एससी ५ मिलि प्रति १० लीटर पाण्यात मिक्स करून वापरावे. किंवा  पेरणीनंतर १५ ते २० दिवसाच्या दरम्यान तण दोन ते तिन पानावर असताना इमॅझिथायपर 20 मिली १० लीटर पाण्यात मिक्स करून फवारणी करावी.  अशाप्रकारे सोयाबीन पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी शेतकरी बांधवानी अस्टसूत्रीचा वापर करावा.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे