आदर्श गाव निर्मिती कार्यक्रमांतर्गत शेलगाव घुगे येथे खरीप हंगाम पूर्व शेतकरी सभा उत्साहात




आदर्श गाव निर्मिती कार्यक्रमांतर्गत शेलगाव घुगे येथे

खरीप हंगाम पूर्व शेतकरी सभा उत्साहात

       वाशिम, दि. 20 (जिमाका) : कृषी संशोधन केंद्र, वाशिम व कृषी विज्ञान केंद्र, करडा यांच्या संयुक्त विद्यमाने व कृषी विभाग व इतर संलग्न विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील शेलगाव (घुगे) या गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आदर्श गाव निर्मितीकरीता निवड करण्यात आली आहे. या अनुषंगाने 19 जून रोजी शेलगांव येथे खरीप हंगाम पूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोलाचे कुलगुरु डॉ. शरदचंद्र गडाख, होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापिठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ.धनराज उंदीरवाडे, पंचायत समितीचे सभापती श्री. बालाजी वानखेडे, व सरपंच रत्नमाला घुगे हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शंकर कोकडवार, कृषी विज्ञान केंद्र करडाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. रवींद्र काळे, तंत्र अधिकारी, (कृषी विस्तार) दिलीप कंकाळ, तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ यांची उपस्थिती होती.

          कार्यक्रमाला गावातील जवळपास 125 शेतकरी उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरु डॉ. गडाख यांनी विविध कृषी संलग्न विभागाच्या सहकार्याने वेगवेगळ्या कृषी संलग्न उद्योगांच्या मदतीने विविध शेती संबंधित प्रकल्प उभारून शेतमालाचे मूल्यवर्धन करून वेगवेगळ्या शेतीविषयक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गावाचा सर्वांगीण विकास कसा करता येतो याबाबत उदाहरणांसह विस्तृत मार्गदर्शन त्यांनी केले.

           डॉ. उंदीरवाडे यांनी सोयाबीन या महत्त्वाच्या पिकाच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने सोयाबीनच्या उगवण शक्ती व बीज प्रक्रियेचे महत्व याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न कशा पद्धतीने दुप्पट करता येऊ शकते याबाबत माहिती दिली.

           श्री. कोकडवार यांनी शेतकरी हितार्थ नाबार्डच्या विविध योजना व शेतकऱ्यांचे शेतीपासूनचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने माहिती दिली.

            तंत्र अधिकारी श्री. कंकाळ यांनी शेतकऱ्यांचे कृषीविषयक उत्पादन व उत्पन्न वाढविणे व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या अनेक योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. काळे यांनी शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढविणे, शेतीमालाचे मूल्यवर्धन करणे, तसेच संत्रा, अंडी व इतर उत्पादनाच्या विक्री व्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.

            गावातील शेतकरी विठ्ठल घुगे यांनी शेळीपालन, कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती करण्याचा मानस व्यक्त केला. त्यानंतर गणेश घुगे यांनी या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने कृषी सहाय्यक संदीप गुट्टे, अंजली ठोसर, चैताली शिंदे, गोपाळ घुगे, रवी घुगे, बद्रीनाथ घुगे, देविदास घुगे, विठ्ठल घुगे,गणेश मोहिते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी ग्रामसेविका जया वाडजे, तलाठी श्रीमती एस. झेड. गेडाम, कृषी सहाय्यक पी. जे. राठोड, पोलीस पाटील भगवान घुगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोकराव घुगे, उपसरपंच दिपाली घुगे, सदस्या वर्षा घुगे यांची यावेळी उपस्थिती होती.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाशिमच्या कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.भरत गीते यांनी केले. आभार कृषी सहाय्यक श्री. अंबेनगरे यांनी मानले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे