स्वयंघोषीत स्वयंसेवकाच्या फसवणूकीला बळी पडू नका जन आरोग्य योजनेतून10 वर्षात 44 हजार रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रीया.. 178 कोटी 95 लक्ष रुपये शासनाकडून खर्च..जिल्हयातील 12 रुग्णालयांचा योजनेत समावेश




स्वयंघोषीत स्वयंसेवकाच्या फसवणूकीला बळी पडू नका

जन आरोग्य योजनेतून

10 वर्षात 44 हजार रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रीया

· 178 कोटी 95 लक्ष रुपये शासनाकडून खर्च

· जिल्हयातील 12 रुग्णालयांचा योजनेत समावेश

       वाशिम, दि. 07 (जिमाका) : ग्रामीण व शहरी भागातील कमी उत्पन्न गटातील व्यक्ती, शेतकरी व बांधकाम क्षेत्रातील मजूराला एखादा आजार झाला असेल किंवा शस्त्रक्रीया करण्याची आवश्यकता असल्यास त्यांना महागडे उपचार व शस्त्रक्रीया करणे आर्थिकदृष्टया परवडणारे नसते. या रुग्णांसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रीया करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जीवनदायी ठरली आहे. सन 2013 पासून सुरु झालेल्या या योजनेचा लाभ जिल्हयातील 44 हजार 28 रुग्णांनी घेतला आहे. या रुग्णांवर या योजनेतून 74 हजार 388 उपचार व शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या उपचार व शस्त्रक्रीयांवर शासनाकडून 178 कोटी 95 लक्ष 73 हजार 940 रुपये खर्च करण्यात आले आहे. जिल्हयातील 12 रुग्णालयात या योजनेतून उपचार व शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहे.   

         जिल्हयात या योजनेचा लाभ जिल्हा रुग्णालय वाशिम, उपजिल्हा रुग्णालय कारंजा, ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर, देवळे हॉस्पीटल वाशिम, बिबेकर हॉस्पीटल वाशिम, वाशिम क्रिटीकल केअर वाशिम, लाईफ लाईन हॉस्पीटल वाशिम, डॉ. वोरा हॉस्पीटल वाशिम, गजानन चिल्ड्रेन हॉस्पीटल वाशिम, श्री. गजानन बाल रुग्णालय मालेगांव, कानडे बाल रुग्णालय वाशिम आणि मॉ. गंगा मेमोरीयल हॉस्पीटल वाशिम या 12 अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून देण्यात येतो.

          महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबरोबरच आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. गंभीर आजारांवरील उपचार व शस्त्रक्रीया पुर्णपणे या योजनेतून नि:शुल्क व गुणवत्तापुर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजसाठी अंगीकृत असलेल्या जिल्हयातील 12 रुग्णालयातून उपलब्ध्‍ा करुन देण्यात येतो.

          पिवळया, अंत्योदय अन्न योजना, अन्नपुर्णा योजना व केशरी (1 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न) शिधापत्रिकाधारक कुटूंब, शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटूंब, बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटूंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहे. या योजनेअंतर्गत 996 उपचार व शस्त्रक्रीया तसेच 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी कुटूंबाला प्रति कुटूंब प्रती वर्ष 1 लाख 50 हजार रुपयापर्यंत विमा संरक्षण, मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2 लाख 50 हजार रुपये आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रती कुटूंब प्रती वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण लाभार्थी कुटूंबाला कोणत्याही एका व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो.

         या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांने स्वत:ची शिधापत्रिका किंवा शासकीय ओळखपत्राच्या आधारे आपल्या कुटूंबाची नोंद करण्यासाठी जवळच्या अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधावा. लाभ घेत असलेल्या लाभार्थ्याला योजनेशी संबंधीत काही अडचण/ तक्रार असल्यास त्यांनी रुग्णालयात उपस्थित असलेल्या आरोग्य मित्राला आपले म्हणणे/तक्रार सविस्तर लेखी स्वरुपात कळवावी. जेणेकरुन तक्रारीचे त्वरीत निराकरण करणे सोयीचे होईल. सोबतच तक्रार/सूचना व अधिक माहितीकरीता योजनेचे जिल्हा कार्यालय आणि टोल फ्री क्रमांक 18002332200 या क्रमांकाशी संपर्क साधावा.

          जिल्हयात मागील काही दिवसांमध्ये या योजनेची कार्यपध्दती माहिती नसणारे काही स्वयंघोषीत समाजसेवक रुग्णाच्या असहाय्यतेचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना रुग्णालयाकडून अधिकचे पैसे मिळवून देतो अशी बतावणी करीत उपचार मोफत झालेले असतांना देखील रुग्णालयाविरुध्द तक्रार करायला लावत आहे. त्याआधारे योजनेमध्ये मोफत सेवा पुरविणाऱ्या रुग्णालयांना वेठीस धरुन पैशाची मागणी करीत आहे. रुग्णांनी अशा भूलथापांना बळी न पडता अधिकृत ठिकाणीच आपली तक्रार दाखल करावी. रुग्णांची फसवणूक होऊ नये याकरीता https://www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर आणि टोल फ्री क्रमांक 18002332200 आणि 155338 तसेच आरोग्य मित्र, जिल्हा कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे संपर्क साधावा.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे