राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरा



राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म दिवस

सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरा

वाशिम, दि. 26 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म दिवस 26 जून हा “सामाजिक न्याय दिन” म्हणून आज साजरा करण्यात आला. सकाळी 8 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष वसंतराव धाडवे, श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. यु. एस. जमदाडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत समता दिंडीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. समता दिंडीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून पोलिस स्टेशन-बस स्टँड मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे समारोप करण्यात आला.

            समता दिंडी रथामधील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा फोटो व घोड्यावर स्वार झालेला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या वेषभूषेमधील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज येथील विद्यार्थी हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. तसेच या दिंडीमध्ये जिल्हातील नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थींनी, गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी, समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि समाज कल्याण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रस्ताविकातून राहुल शिरभाते यांनी सामाजिक न्याय दिन व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्ये पदार्थ सेवनविरोधी दिवसानिमित्त नशामुक्ती अभियानाअंतर्गत पी. पी. टी. द्वारे माहिती दिली.

कार्यक्रमामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त शाहिर संतोष खडसे यांच्या समता संदेश सांस्कृतिक कला पथकाद्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर आधारीत गीतांचे गायन केले. त्यांच्या पथकामध्ये भगवान कांबळे, संतोष कांबळे, गौतम जोंधळे, आशित खडसे, प्रकाश खडसे, भगवान भगत, गौतम कांबळे यांचा समावेश होता.

सामाजिक न्याय दिनानिमित्त श्री. खंदारे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सहभोजनाद्वारे जाती निर्मुलनाची चळवळ सुरु केली व नामदेव महाराजांची विचारधारा पुढे चालवली तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे भविष्याचा वेध घेणारे लोकपुरुष व कृतीशिल राजे होते असे सांगितले. रामराव झनक महाविद्यालय, मालेगावचे प्रा. डॉ. अनिल राठोड यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.

बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपल्या अर्थसंकल्पात भरीव तरतूदही केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना व कामगारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना केल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. गजानन हिवसे यांनी केले उपस्थितांचे आभार समतादूत प्रणीता दसरे यांनी मानले. कार्यक्रमाकरीता जिल्ह्यातील नर्सींग महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थींनी, नागरीक तसेच सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतीगृहातील गृहपाल, शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व समाज कार्य महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, व श्री. अनिल गायकवाड, व्यवस्थापक व सर्व ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे