मानव विकास मिशनचा पुढाकारमाविमच्या 140 बचतगटांना मिळाल्या 1540 शेळया व बोकुड· महिलांच्या अर्थाजनाला मिळणार शेळीपालनाचे बळ· 1 कोटी 26 लक्ष रुपयातून शेळयांची खरेदी· 20 लक्ष रुपये महिलांचा वाटा· शेळी मेंढी विकास महामंडळाकडून शेळयांची खरेदी



मानव विकास मिशनचा पुढाकार

माविमच्या 140 बचतगटांना मिळाल्या 1540 शेळया व बोकुड

·        महिलांच्या अर्थाजनाला मिळणार शेळीपालनाचे बळ

·        1 कोटी 26 लक्ष रुपयातून शेळयांची खरेदी

·        20 लक्ष रुपये महिलांचा वाटा

·        शेळी मेंढी विकास महामंडळाकडून शेळयांची खरेदी

       वाशिम, दि. 20 (जिमाका) :  ग्रामीण महिलांच्या प्रगतीत महिला आर्थिक विकास महामंडळाचा अर्थात माविमचा महत्वपूर्ण वाटा आहे.  महिलांना बचतगटाच्या माध्यमातून एकत्र करुन त्यांना पैशाच्या बचतीचे महत्व पटवून देवून बचतीची सवय लावण्यासोबतच त्यांना उद्योग-व्यवसाय सुरु करण्यास मदतीचा हात देण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून माविम करीत आहे. वाशिमसारख्या मागास जिल्हयात माविमने मानव विकास मिशनच्या पुढाकारातून 140 बचतगटांच्या 1400 महिलांना 1540 शेळया आणि बोकुड वाटप करुन त्यांच्या अर्थाजनाला पाठबळ देवून आणखी एक व्यवसाय उपलब्ध करुन दिला आहे.

           जिल्हयात माविमच्या 12 लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून 345 गावात बचतगटांचे काम सुरु आहे. 2906 बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 39 हजार 593 महिला बचतगटांशी जुळल्या आहे. ग्रामीण भागातील बचतगट केवळ बचतीपुरते मर्यादीत न राहता बचतगटातील पैसा बचतगटातील महिलांना योग्य वेळी कामी पडला पाहिजे तसेच त्यांनी विविध उद्योग व्यवसाय सुरु करुन कुटूंबाच्या अर्थाजनात महिलांचाही वाटा असावा या भूमिकेतून माविम ग्रामीण महिलांसाठी काम करतांना दिसत आहे. जिल्हयातील ग्रामीण महिलांचे जीवनमान उंचावले पाहिजे यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविम काम करीत आहे. मानव विकास मिशनच्या पुढाकारातून माविमने महिलांच्या सक्षमीकरणाला मोठी चालना दिली आहे. ग्रामीण भागातील बचतगटातील महिला हया शेळीपालनाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करु शकतात या विश्वासाच्या बळावर वाशिम, मालेगांव, रिसोड आणि मानोरा तालुक्यातील 7 लोकसंचालित साधन केंद्राअंतर्गत कार्यरत 140 बचतगटातील 1400 महिलांना 1540 शेळया व बोकूड देण्यात आले आहे.

          मानव विकास कार्यक्रम सन 2022-23 या वर्षात 140 बचतगटांना प्रत्येकी 10 शेळया व एक बोकुड नुकतेच देण्यात आले. शेळयांची खरेदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाकडून करण्यात आली. शेळयांची खरेदी महिलांनी अमरावतीजवळील पोहराबंदी येथे जाऊन पारंपारीक पध्दतीपेक्षा अधिक खात्रीने केली. मानव विकास कार्यक्रमामधून हया शेळी व बोकुड खरेदीसाठी 1 कोटी 26 लक्ष रुपये मानव विकास कार्यक्रमाच्या निधीतून खर्च करण्यात आले. बचतगटातील महिलांनी 20 लक्ष रुपये आपला लोकसहभाग त्यामध्ये दिला. विशेष म्हणजे प्रत्येक शेळी व बोकडाचा विमा देखील काढला आहे. शेळयांची खरेदी करतांना पोहराबंदी येथील महामंडळाच्या केंद्रावर शेळयांचे लसीकरण व निरोगीपणा बघण्याकरीता संबंधित तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेळयांची खरेदी केल्यानंतर थेट संबंधित बचतगटाच्या गावात हया शेळया पोहचून देण्यात आल्या. संबंधित बचतगटातील महिला हया एकत्रितरीत्या शेळयांचे संगोपन करत आहे. ज्या गावातील बचतगटांना हया शेळया पुरविण्यात आल्या आहेत. त्या शेळयांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरीता एका पशु सखीची सेवा संबंधित लोकसंचालित साधन केंद्राकडून पुरविण्यात येणार आहे. तसेच पुढे हयाच केंद्राकडून शेळी व बोकुड विक्रीस देखील मदत करण्यात येणार आहे.

          जिल्हयातील माविमच्या वाशिम, कळंबा (महाली), अनसिंग, मालेगांव-1, मालेगांव-2, पोहरादेवी आणि रिसोड या लोकसंचालित साधन केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील 140 बचतगटातील 1400 महिलांना शेतीपुरक व्यवसाय शेळीपालनातून उपलब्ध झाला आहे. भविष्यात या व्यवसायातून 1400 महिलांची आर्थिक व सामाजिक स्थिती निश्चितपणे बदललेली दिसणार आहे. त्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होवून खऱ्या अर्थाने बचतगटातील महिलांचा या व्यवसायातून मानव विकास झालेला दिसून येईल. 

*******



Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे