विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप
·
जनजागृती फेरीतून
विद्युत सुरक्षेचा संदेश
वाशिम, दि. १८ : उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत ११ ते १७
जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. या कालवधीत विद्युत
निरीक्षण विभागाच्या विद्युत निरीक्षक कार्यालयाने विविध उपक्रमांचे आयोजन करून
तसेच शाळा, महाविद्यालये येथे कार्यक्रमांचे आयोजन करून विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती
केली. या सप्ताहाच्या समारोपानिमित्त १७ जानेवारी रोजी जनजागृती फेरीचे आयोजन करून
याद्वारे वीज सुरक्षेविषयी माहिती देण्यात आली.
जनजागृती फेरीमध्ये वाशिम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे
शिक्षक व विद्यार्थी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, वाशिम जिल्ह्यातील विद्युत
कंत्राटदार व त्यांचे कामगार तसेच विद्युत निरीक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी
झाले होते. महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया व विद्युत निरीक्षक सारंग
नाईक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जनजागृती फेरीची सुरुवात केली. विद्युत
निरीक्षक कार्यालयापासून बस स्थानक, आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका येथून सुरक्षा
संदेश देत परिक्रमण करून महावितरणच्या विद्युत भवन परिसरात आल्यानंतर या जनजागृती
फेरीची सांगता करण्यात आली.
विद्युत सुरक्षा सप्ताहचा समारोपीय कार्यक्रम विद्युत
भवनच्या प्रांगणात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे अधीक्षक अभियंता
श्री. बेथारीया होते. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संदीप
बोरकर, वाशिम जिल्हा विद्युत कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष संजय मिसाळ, शाम देवढे,
महावितरणचे कार्यकारी अभियंता पी. डी. चव्हाण, विद्युत निरीक्षक श्री. नाईक
उपस्थित होते.
श्री. नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्युत
सुरक्षा सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील २१ शाळा, महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम, निबंध,
चित्रकला व कविता स्पर्धांचे आयोजन केल्याचे सांगितले. सामान्य नागरिकांपर्यंत विद्युत
सुरक्षा संदेश पोहोचविण्यासाठी विद्युत सुरक्षा रथ, रेडीओच्या माध्यमातून आवाहन
तसेच ठिकठिकाणी सुरक्षा संदेश देणारे फलक लावण्यात आल्याचे सांगितले.
विद्युत
सुरक्षा सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या निबंध, चित्रकला व कविता स्पर्धेतील विजेत्या
स्पर्धकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव
करण्यात आला. तसेच यावर्षी नाविन्यपूर्ण कार्यासाठी वाशिम जिल्हा विद्युत
कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष, रेडीओ वत्सगुल्म व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक अशांत
कोकाटे यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्योत काकणे
यांनी केले, तर आभार सहाय्यक विद्युत निरीक्षक अमृता फुलझेले यांनी मानले. विद्युत
सुरक्षा सप्ताह यशस्वीपणे राबविणेसाठी विद्युत निरीक्षक श्री. नाईक यांच्या
मार्गदर्शनाखाली विभागातील सहाय्यक विद्युत निरीक्षक कु. फुलझेले, सहाय्यक अभियंता
नितेश चुदरे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment