माय मराठीच्या संवर्धनासाठी कृतीशील प्रयत्नांची गरज
·
जिल्हा
न्यायालय येथे परिसंवाद
·
मराठी
भाषा संवर्धन पंधरवडा
वाशिम, दि. ०२ :
मराठी भाषा ही अतिशय समृद्ध भाषा आहे. या भाषेने आजपर्यंत अनेक संकटांवर मात करत
आपले अस्तित्व टिकविले आहे. प्राचीन काळापासून लोकभाषा म्हणून अस्तित्वात असलेल्या
या माय मराठीसमोर आज अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण
सर्व मराठी बांधवांनी कृतीशील प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत राजस्थान आर्य
महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय जाधव व श्रीमती शांताबाई गोटे महाविद्यालयाचे प्रा.
डॉ. विष्णू लांडे यांनी व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ
संघाच्यावतीने जिल्हा न्यायालयामध्ये आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत
‘मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी न्या. डॉ.
रचना तेहरा होत्या.
यावेळी ज्येष्ठ
विधिज्ञ अॅड. उदय देशमुख, जिल्हा विधिज्ञ संघाचे उपाध्यक्ष अॅड. अमरसिंह रेशवाल
यांच्यासह जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वकील, पक्षकार व नागरिकांची उपस्थिती
होती.
डॉ. लांडे
म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेची महती अमृतालाही
लाजवेल अशी आहे. मराठी भाषेचा इतिहास पाहिला तर आजपर्यंत या भाषेने अनेक संकटे,
परकीय आक्रमणे यांचा सामना करूनही आपले अस्तित्व टिकवून ठेवल्याचे दिसते. ‘विवेक
सिंधू’ हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ. आठव्या शतकापासून मराठी लेखी स्वरुपात आली. आज
या भाषेने विकासाचा मोठा टप्पा गाठला आहे. मात्र आज काही कारणांमुळे या भाषेच्या
भविष्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. आजपर्यंतचा इतिहास पहिला तर मराठी ही
चिरंजीव भाषा आहे, असे आपण म्हणून शकतो. पण ही भाषा अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी
तसेच या भाषेचा शब्दसंग्रह वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे आपल्याला प्रकर्षाने
जाणवते. हा शब्द संग्रह वाढविण्यासाठी प्रतिकात्मक शब्दाचा व्यावहारिक भाषेतील
वापर वाढविणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. जाधव
म्हणाले, मराठी ही प्राचीन काळापासून लोकभाषा म्हणून अस्तित्वात आहे. या भाषेने
लोकांमध्ये प्रबोधनाचे काम केले आहे. महानुभाव पंथाचे समाज प्रबोधन करणारे विचार
मराठी भाषेतूनच समाजात पोहोचविले गेले. आज इंग्रजी माध्यमातील शिक्षण म्हणजेच
सर्वकाही, असे समजणाऱ्या मानसिकतेमुळे मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र
मातृभाषेतून दिले केलेले शिक्षणच माणसाला ज्ञानी बनविते, हे आपण विसरून चालणार
नाही. मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या कित्येकांनी जीवनात यश मिळविले आहे,
हे आपण दुर्लक्षित करता कामा नये. इंग्रजीचा तिरस्कार करण्याची गरज नाही, मात्र
आपल्या माय मराठीचे संवर्धन झाले पाहिजे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
त्यासाठी प्रत्येकाने कृतीशील प्रयत्न करण्याची गरज असून बोलीभाषेतील जास्तीत
जास्त शब्दांचा समावेश मराठी भाषेत करून मराठी भाषा समृद्ध करावी, असे मत त्यांनी
यावेळी व्यक्त केले.
न्या. डॉ.
तेहरा म्हणाल्या, आज मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आपण
दैनंदिन जीवनात मराठीचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. तसेच मराठीतून बोलताना
त्यामध्ये इतर भाषेतील वाक्यांची सरमिसळ होऊ नये, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.
अॅड.
देशमुख म्हणाले, मराठी भाषा टिकली पाहिजे, तिचे संवर्धन करण्याची गरज आहे.
न्यायालयीन कामकाजात मराठीचा वापर होतो. हा वापर अधिक अचूकपणे होण्यासाठी वकील
मंडळींनी आपला शब्द संग्रह वाढविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव अॅड. ढवळे यांनी केले, उपस्थितांचे आभार
अॅड. श्रद्धा अग्रवाल यांनी मानले.
आज ‘काव्य
वाचन’
जिल्हा
न्यायालयात आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडामध्ये आज, ३ जानेवारी रोजी दुपारी २
वाजता काव्य वाचन कार्यक्रम होणार आहे. यामध्ये कवी डॉ. विजय काळे, उज्ज्वला मोरे,
चाफेश्वर गांगवे सहभावी होवून आपल्या कविता सादर करतील.
सुंदर.... महितीवर्धक.... ज्ञानवर्धक...
ReplyDelete