साखरा येथील आंतरराष्ट्रीय शाळेसाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री संजय राठोड
·
भूमीअधिग्रहण व सांस्कृतिक कार्यक्रम
वाशिम, दि. २८ :
साखरा येथील भारतरत्न अटल बिहारी
वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या इमारत उभारणीसाठी तसेच शाळेच्या विकासासाठी निधी
कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन व विकास समिती तसेच शासनामार्फत शाळेला
आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. २६ जानेवारी रोजी साखरा येथील भारतरत्न
अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या सांस्कृतिक व भूमीअधिग्रहण कार्यक्रमात
ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख,
जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, वाशिमचे नगराध्यक्ष
अशोक हेडा, शिक्षणाधिकारी माध्यमिक तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री.
तुमराव, सरपंच चंद्रकला इंगळे, उपसरपंच द्वारकाबाई राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे
अध्यक्ष रामेश्वर इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, दर्जेदार
शिक्षण ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय शाळेमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य
कुटुंबातील विद्यार्थांना चांगले शिक्षण उपलब्ध होणार आहे. राज्यात केवळ १२
आंतरराष्ट्रीय शाळांना मान्यता मिळाली असून त्यामध्ये साखरा येथील शाळेचा समावेश
आहे, ही जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब आहे. ५ हजार विद्यार्थी
क्षमतेच्या या आंतरराष्ट्रीय शाळेचे काम टप्प्या-टप्प्याने होणार आहे. या कामाचे
सूक्ष्म नियोजन करावे. शाळेच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यासाठी
प्रयत्न केला जाईल. शिक्षकांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील
रहावे.
जिल्हा
परिषद अध्यक्ष सौ. देशमुख म्हणाल्या, दर्जेदार शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय शाळा
उपयुक्त ठरणार आहे. गरीब कुटुंबातील मुलांना या शाळेमुळे चांगले शिक्षण मिळणार
असून या शाळेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण केले जाईल.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविकात शिक्षक राजूभाऊ महाले यांनी शाळेचे स्वरूप,शिक्षण पद्धती याविषयी
माहिती दिली.
सर्वप्रथम
पालकमंत्री संजय राठोड यांनी भारतरत्न
अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या नियोजित जागेची पाहणी केली. तसेच
शाळेच्या प्रस्तावित प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते शाळेच्या
फलकाचे अनावरण करण्यात आले.
Comments
Post a Comment