विद्युत निरीक्षण विभागामार्फत विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती




वाशिम, दि. १६ : उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील महावितरणच्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्रमधील कार्यरत यंत्रचालकांची विद्युत सुरक्षाविषयी कार्यशाळा १४ जानेवारी रोजी विद्युत भवनमध्ये घेण्यात आली.

या कार्यशाळेमध्ये उपस्थित यंत्रचालकांना महापारेषणच्या चाचणी विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पी. एम. देशपांडे यांनी विद्युत सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी उपस्थितांना ‘महावितरण’मार्फत विद्युत सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला विद्युत निरीक्षक सारंग नाईक, सहाय्यक विद्युत निरीक्षक अमृता फुलझेले, महावितरणचे कार्यकारी अभियंता पी. के. चव्हाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे
वाशिम विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून १४ जानेवारी रोजी शहरातील हैप्पी फेसीस स्कूलमध्ये विद्युत सुरक्षेबाबत विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्युत निरीक्षक सारंग नाईक व सहाय्यक विद्युत निरीक्षक अमृता फुलझेले यांनी विद्युत उपकरणे हाताळताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत माहिती दिली.
विद्युत सुरक्षा सप्ताहाचा आज समारोप
सर्वसामान्य नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत ११ ते १७ जानेवारी २०१९ दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाचा समारोप आज होत असून यानिमित्त १७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्युत निरीक्षक विभागातील अभियंते, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच तंत्र निकेतन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. विद्युत निरीक्षक कार्यालय येथून रॅलीचा शुभारंभ होणार आहे. बस स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाकामार्गे विद्युत भवन येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप होईल. दुपारी १२ वाजता विद्युत भवन येथे समारोपीय कार्यक्रम होणार असून विद्युत सुरक्षा सप्ताह दरम्यान आयोजित विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी केले जाणार आहे, असे वाशिम विद्युत निरीक्षक कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे