मराठी भाषा आणखी समृद्ध व्हावी - न्या. एस. बी. पराते
·
मराठी
भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन
वाशिम, दि. ०१ : मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. मराठी भाषेचा वापर मोठ्या
प्रमाणात झाला पाहिजे. या भाषेचे महत्व अनन्यसाधारण आहे. हे महत्व लक्षात घेवून ती
आणखी समृद्ध कशी होईल, यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे प्रतिपादन न्या. एस.
बी. पराते यांनी केले.
१ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयाच्या
सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधिज्ञ मंडळ, वाशिम यांच्या
संयुक्तवतीने १ ते १५ जानेवारी दरम्यान आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी न्या. पराते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून न्या.
डॉ. रचना तेहरा, न्या. एस. पी. शिंदे, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड.
अजयकुमार बेरिया, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड, शल्य चिकित्सक डॉ. अनिल
कावरखे तर वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती.
डॉ. कावरखे म्हणाले, मराठी भाषा
संवर्धन करण्याची गरज का पडली, याचा विचार होणे आवश्यक आहे. भाषा जात, धर्म, पंथ पाळत
नाही. मराठी भाषा खूप छान आहे. आज मराठी भाषाच पोरकी झाली आहे. मराठी भाषेतील अनेक
व्यक्तींना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मराठीचे संवर्धन करणे काळाची गरज
असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. खडसे म्हणाले, मराठी ही जगातील
दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे,
यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शासकीय व्यवहारामध्ये राजभाषा मराठीचा वापर शंभर
टक्के करण्याचे शासनाचे धोरण आहे. मराठी भाषेला तिच्या वैभवशिखरावर कायमचे
ठेवण्यासाठी राज्य शासनाने मराठी भाषेसाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. राज्य
शासनाच्या अखत्यारीत असलेली सर्व आस्थापना, महामंडळे, प्राधिकरण, न्यायाधिकरण व
विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निकालपत्रे मराठीतून देण्याचे बंधन केले
आहे. पक्षकाराला आपल्याला कोणता निकाल दिला आहे. या निकालात काय म्हटले आहे, हे
समजणे महत्वाचे आहे.
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे
महत्व अमृतातही पैजा जिंके असे केले आहे. सुमारे अठराशे वर्षांपूर्वी मानव जातीची
वैश्विक संकल्पना ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मांडली. यादव काळात १३ व्या शतकात
मराठी ही लोकभाषा होती. त्या काळच्या सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या शिलालेखांची भाषा
मराठीच असल्याचे दिसून येत असल्याचे श्री. खडसे यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या
प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला न्या. एस. व्ही. फुलबांधे, न्या.
श्रीमती के. बी. गीते, न्या. एस. पी. वानखेडे, न्या. एम. एस. पौळ, न्या. एस. पी.
बुंदे, जिल्हा वकील संघाचे सचिव अॅड. प्रसाद ढवळे यांच्यासह वकील मंडळी तसेच
पक्षकार, न्यायालयातील कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक
अॅड. अजयकुमार बेरिया यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार अॅड. अमरसिंह रेशवाल
यांनी मानले.
अत्यंत छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मराठी भाषा खरोखरच समृद्ध आहे.ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पु ल देशपांडे, प्र के अत्रे, कुसुमाग्रज, केशवसुत , ना सी फ़डके , वि स खांडेकर , गदिमा ,राम गणेश गडकरी ,माधव ज्युलियन सारख्या कवी कादंबरीकार नाटककारांनी मराठी भाषेला अतुलनीय गौरव प्राप्त करुन दिला...आज ज्ञानाचे , संस्कृतीचे, विद्यानाचे भांडार म्हणजे मराठी भाषा आहे....
ReplyDelete