समाज जीवनातील वास्तवाचा काव्यातून घेतला वेध






·         जिल्हा न्यायालयात ‘काव्य वाचन’
·         ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त आयोजन
वाशिम, दि. ०९ : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त जिल्हा न्यायालयात ९ जानेवारी रोजी आयोजित काव्यवाचन कार्यक्रमात सहभागी झालेल्या कवींनी आपल्या कवितांमधून आजच्या समाज जीवनातील वास्तवाचा वेध घेतला. कवी मोहन शिरसाट, कवी गजानन फुसे, कवी महेंद्र ताजणे आणि कवियित्री प्रा. सुनिता अवचार यांनी या काव्यवाचन कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या. एम. एस. पौळ तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. ए. आर. व्यवहारे उपस्थित होते.
श्री. शिरसाट यांच्या ‘घर’ कवितेने काव्यवाचन कार्यक्रमास सुरुवात झाली. या कवितेतून त्यांनी आपण जीवनात कोणत्या गोष्टींना महत्व दिले पाहिजे व काय टाळले पाहिजे, याची मांडणी केली. शस्त्रांपेक्षा आपण शास्त्राला व पुस्तकाला महत्व दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर श्री. फुसे यांनी ‘सावळा विठ्ठल’ कविता सादर करून शेती आणि शेतीशी निगडीत कामांत आपला देव शोधण्याचे आवाहन केले. त्यानंतर श्री. ताजणे यांनी त्यांच्या कवितेचा जन्म कसा होतो हे ‘तरीही धुळीला पुन्हा जातातच दिवस’ या कवितेतून उपस्थितांसमोर मांडले.
प्रा. अवचार यांनी ‘टुडेज फेमिनिझम सर्च’ या कवितेतून स्त्री जन्माच्या व्यथा व त्यांच्या शिक्षणापासून ते जीवनातील विविध टप्प्यांवर समाजाच्या विविध परंपरांमुळे घातली जाणारी बंधने आणि त्यामुळे होणारी घुसमट व्यक्त केली. त्यानंतर श्री. शिरसाट यांनी सादर केलेल्या ‘पुरुष म्हणून केलेल्या अन्यायाची कबुली’ या कवितेनेही पुरुषांकडून स्त्रियांवर होत असलेला अन्याय व समाजात, कुटुंबात मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीची मांडणी केली. महिलांच्या जीवनावर आणि त्यांना समाजात मिळणाऱ्या वागणुकीविषयी कवितेतून झालेल्या या मांडणीने उपस्थितांना अंतर्मुख होऊन विचार करावयास भाग पाडले.
त्यानंतर श्री. फुसे यांनी ‘आई’ आणि  श्री. ताजणे यांनी ‘माय तू’ या काबाड कष्ट करत जीवनाचा गाडा हाकणाऱ्या आईची महती सांगणाऱ्या कविता सादर केल्या. प्रा. अवचार यांनी सादर केलेल्या ‘माझे आत्मचरित्र’ कवितेने काव्यवाचनाची सांगता झाली. यावेळी बोलताना न्या. पौळ म्हणाले, आपण दैनंदिन जीवनात मराठीचा वापर कमी प्रमाणात करीत असल्याने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित करण्याची वेळ आपल्यावर आली. मराठी ही अतिशय समृद्ध भाषा आहे. या भाषेत अनेक अनमोल ग्रंथ उपलब्ध आहे. त्यांचे वाचन करण्याची गरज आहे. प्रत्येकाने मराठी ग्रंथ वाचनाची आवड जोपासून दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे, न्या. एस. बी. पराते, न्या. डॉ. रचना तेहरा, न्या. एस. पी. शिंदे, न्या. एस. पी. बुंदे, न्या. श्रीमती के. बी. गीते, न्या. पी. एच. नेरकर, न्या. एस. पी. वानखडे, जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड अजयकुमार बेरिया, उपाध्यक्ष ॲड. अमरसिंह रेशवाल, कोषाध्यक्ष ॲड. श्रध्दा अग्रवाल यांच्यासह विधीज्ञ मंडळी, पक्षकार, न्यायालयातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे उपस्थितांचे आभार ॲड. प्रसाद ढवळे यांनी मानले.
*****

Comments

  1. मंत्रमुग्ध काव्यवाचन......

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे