पोहरादेवी विकासाचे योग्य नियोजन करा - पालकमंत्री राठोड
वाशिम, दि. १६ : देशातील लाखो बंजारा समाज बांधवांचे तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवीच्या विकासासाठी राज्य शासन १०० कोटी रुपये अतिरिक्त निधी देणार आहे. राष्ट्रीय स्तरावर या तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे, ही आपली भावना आहे. तेथे येणाऱ्या यात्रेकरूंच्या दृष्टीने सर्वसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या तीर्थक्षेत्राचा सर्वांग सुंदर असा विकास आराखडा तयार करतांना सूक्ष्म आणि योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
आज जिल्हा नियोजन समितीच्या
सभागृहात पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यासाठी पालकमंत्री राठोड
यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत
होते. सभेला जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक
अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, प्रभारी जिल्हा नियोजन
अधिकारी भारत वायाळ, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पी. के. चव्हाण, कारंजा
उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी मानोरा तहसीलदार सुनील चव्हाण यांची उपस्थिती
होती.
श्री. राठोड म्हणाले की, विकास
आराखडा तयार करतांना वाहनतळ, परकोट तयार करण्यात यावा. भविष्यात पोहरादेवी येथे
पाणी टंचाईच भासणार नाही, यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार करण्यासाठी १०
कोटी रुपयांची तरतूद करावी. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये दुकानांचा समावेश
करावा. कोणीही इतर ठिकाणी अतिक्रमण करणार नाही, याची दक्षता घ्यावी. महसूल
विभागाची किती जमीन उपलब्ध आहे, हे शोधावे. अतिक्रमित जमीन किती आहे, याची देखील
माहिती उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तयार करण्यात
आलेल्या पोहरादेवी विकास आराखड्याच्या नकाशाची पाहणी करून पालकमंत्र्यांनी काही
उपयुक्त सूचना केल्या.
Comments
Post a Comment