संतांनी मराठी भाषा समृद्ध करण्याचे काम केले - किसन गंगावणे




·        मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
वाशिम, दि. ०८ : महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यासह अनेक संतांनी प्रबोधनाचे काम केले. या संतांनी श्रमप्रतिष्ठेचे महात्म्य सांगितले आहे. संतांनी त्याकाळी अभंग, ओवी, भारुड, कीर्तन, प्रवचन मराठी भाषेत करून मराठी भाषा समृद्ध करण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन साहित्यिक किसन गंगावणे यांनी केले.
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वाशिम जिल्हा विधिज्ञ संघाच्यावतीने जिल्हा न्यायालयामध्ये ८ जानेवारी रोजी आयोजित ‘संत साहित्य आणि मराठी’ या विषयावर श्री. गंगावणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या. एस. पी. बुंदे, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती सुचिता कुलकर्णी उपस्थित होत्या.
श्री. गंगावणे म्हणाले, श्रमातून नवनिर्मिती होते. श्रम हेच देव आहेत, ही शिकवण संतांनी दिली. जीवनात संतांनी नैतिक मुल्यांची जोपासना केली. त्याकाळी कर्मकांडांनी जनता त्रस्त आणि निष्क्रिय झालेली असताना त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम संतांनी केले. वारकरी संप्रदाय ही संत नामदेवांनी दिलेली लोकशाही आहे. संत नामदेव ज्या-ज्या प्रांतात वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी गेले, तेथील भाषा त्यांनी अवगत केली. त्यांनी चारवेळा पदयात्रेच्या माध्यमातून भारत भ्रमण केले. या पदयात्रेतून त्यांनी लोकांचे मत परिवर्तन केल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व संतांनी श्रमाची प्रतिष्ठा बाळगल्याचे सांगून श्री. गंगावणे म्हणाले, संत नामदेवांनी आपला व्यवसाय सांभाळून भक्ती केली. सर्व संतांनी त्याकाळी कृतीत आचरण आणल्यामुळे हे संत श्रेष्ठ ठरले. मराठी भाषा आणखी समृद्ध करावयाची असेल तर सर्व प्रकारचे साहित्य मराठी भाषेत आले पाहिजे. कवी सुरेश भटांनी गझल सर्व प्रथम आणली, माधव ज्यूलियन यांनी काव्य संग्रह मराठीतून आणला. साहित्याने लोकांच्या हृदयाशी संवाद साधला पाहिजे, अशा प्रकारच्या साहित्याची निर्मिती झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
न्या. बुंदे म्हणाले, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी साजरा करण्यात येत असलेल्या पंधरवड्यात निश्चित प्रत्येकजन मराठीचा व्यापक प्रमाणात वापर करेल. भविष्यात देखील मराठी भाषेच्या समृद्धीसाठी काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, न्यायालयीन कामकाजात देखील मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
ॲड. श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, मराठी ही प्राचीन व सुंदर भाषा आहे. एकमेकांना जोडण्याची कला मराठी भाषेत आहे. संतांनी त्याकाळी मराठी भाषेचे संवर्धन केले. आपल्यावर असलेला इंग्रजी भाषेचा पगडा दूर झाला पाहिजे. आपली मूळ असलेली भाषा नव्या पिढीला व्यवस्थित बोलता येत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे, न्या. एस. बी. पराते, न्या. डॉ. रचना तेहरा, न्या. एस. पी. शिंदे, न्या. श्रीमती के. बी. गीते, न्या. पी. एच. नेरकर, न्या. एम. एस. पोळ, न्या. एस. पी. वानखडे, जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड अजयकुमार बेरिया, उपाध्यक्ष ॲड. अमरसिंह रेशवाल, कोषाध्यक्ष ॲड. श्रध्दा अग्रवाल यांच्यासह विधीज्ञ मंडळी, पक्षकार, न्यायालयातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे उपस्थितांचे आभार ॲड. पी. पी. अंभोरे यांनी मानले.

Comments

  1. हृदयस्पर्शी व्याख्यान.....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे