जलसंधारणाच्या कामांना गती द्या - विभागीय आयुक्त पीयूष सिंह
वाशिम, दि. ३१ : राज्य शासन व भारतीय जैन संघटना अर्थात बीजेएसच्या यांच्यामध्ये
झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात जलसंधारणाची कामे सुरु आहेत. याकामासाठी बीजेएसने
२८ जेसीबी व १३ पोकलॅन मशीन उपलब्ध करून
दिल्या आहेत. या मशीनद्वारे जिल्ह्यात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे होणे आवश्यक
आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या कामांना गती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त
पीयूष सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत
होते.
यावेळी जिल्हाधिकारी
तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, कृषि सहसंचालक सुभाष
नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा
अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, बीजेएसचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा,
तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर, संतोष वाळके, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.
श्री. सिंह
म्हणाले, बीजेएसच्या सहकार्याने करण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या कामांवर संनियंत्रण
ठेवणे, त्याचे मुल्यांकन करणे व त्या कामासाठी लावण्यात आलेल्या मशीनला इंधन
पुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची
कुचराई होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणा प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे. तसेच
कोणतीही जेसीबी अथवा पोकलॅन मशीन काम नसल्याने अथवा इंधन वेळेत उपलब्ध न झाल्याने
बंद राहणार नाही, याची काळजी संबंधित यंत्रणा प्रमुखाने घ्यावी.
जिल्हाधिकारी
श्री. मीना म्हणाले, जलसंधारणाच्या कामासाठी देण्यात आलेल्या मशीनकरिता संबधित विभागाने
स्वतंत्र नोडल अधिकारी नेमावा. सदर मशीन कामा अभावी अथवा इंधना अभावी बंद
राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित नोडल अधिकाऱ्यावर निश्चित करावी. तसेच काही
तालुक्यांमध्ये इंधनाची देयके देण्यास विलंब होत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत,
याबाबत सुद्धा सर्व यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही वेळेत करावी. अन्यथा संबंधितांवर
कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment