विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !






·        वक्तृत्व स्पर्धा, परिसंवादात मांडले विचार
·        ‘स्वीप’ अंतर्गत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
·        सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

वाशिम, दि. १२ : मतदान हा आपल्याला मिळालेला बहुमूल्य अधिकार आहे, आपलं मत वाया घालवू नका, कोणतेही कारण न देता २१ ऑक्टोंबरला मतदान करा...’ ‘मतदान करताना जाती-धर्माचा विचार न करता योग्य उमेदवार निवडा...’ ‘आपलं मत विकू नका, प्रत्येक मत लोकशाहीची ताकद आहे, ते वाया घालवू नका...असे विचार व्यक्त करून शालेय विद्यार्थ्यांनी मतदान आणि लोकशाही प्रक्रियेचे महत्व पटवून दिले. निमित्त होते जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत स्वीपअंतर्गत आयोजित वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवादाचे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी जिल्ह्यातील शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालक व कुटुंबातील इतर मतदारांपर्यंत मतदार जागृतीचा संदेश पोहोचावा, हा यामागील उद्देश होता. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधून सुमारे ८ हजार विद्यार्थी व माध्यमिक शाळांमधून सुमारे १० हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते, असे शिक्षण विभागाने सांगितले.

लोकशाही प्रक्रियेत मतदानाचे महत्व काय आहे? मतदान का करावे? योग्य उमेदवार कसा निवडावा? आदी विषयांवर शुक्रवारी झालेल्या वक्तृत्व स्पर्धा आणि परिसंवादात विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. तसेच कुटुंबातील व्यक्तींना मतदानाचे महत्व पटवून देवून येत्या २१ ऑक्टोंबर रोजी मतदानासाठी पाठविणारच असा ठाम निर्धारही या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. भावी पिढीसाठी, देशाच्या विकासासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीकारणासाठी प्रत्येकाचे मत महत्वाचे आहे, त्यामुळे कोणतेही कारण न देता आणि कोणतीही भीती न बाळगता सर्वांनी निःपक्षपातीपणे मतदान करावे, असे आवाहनही या विद्यार्थ्यांनी यावेळी केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, सर्व गट शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश