वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश






·         ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
·         अभंग, भारूडातून वृक्षारोपणाविषयी जनजागृती
वाशिम, दि. २९ :  राज्य शासनामार्फत ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत दि. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाविषयी जनजगृती करून त्यांना वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून वृक्ष दिंडीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी के. आर. राठोड, प्रादेशिक वन अधिकारी एस. आर. नंदुरकर, वन परिक्षेत्र अधिकारी आर. पी. कांबळे, ए. एच. थोरात आदी उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते वृक्ष पूजन करून दिंडीला सुरुवात झाली. यावेळी शाहीर धम्मानंद इंगोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभंग, भजन व भारुड सादर करून वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले व वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे हे अधिकारी हातात टाळ घेऊन दिंडीत सहभागी झाले, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विणेकरी बनले होते. लॉयन्स विद्यानिकेतन, बाकलीवाल विद्यालयाचे विद्यार्थी, सावली प्रतिष्ठानचे स्वयंसेवक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या वृक्ष दिंडीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला नाका, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शहर पोलीस स्टेशन व बसस्थानकमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर वृक्ष दिंडीचा समारोप करण्यात आला.
वृक्षलागवड मोहिमेत सहभागी व्हा : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

राज्य शासनामार्फत दि. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वृक्षलागवड मोहीम राबिविली जाणार आहे. पर्यावरणाचा समतोल कायम राहण्यासाठी वृक्षलागवड व त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वृक्षलागवड मोहिमेत सहभाग नोंदवून किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे