पोहरादेवी विकास आराखड्याच्या अनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा
· २९ जून रोजी उच्चस्तरीय समितीसमोर सादरीकरण
वाशिम, दि. २५ : पोहरादेवी विकास आराखड्याविषयी शासनाच्या उच्चस्तरीय समितीसमोर होणाऱ्या सादरीकारणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आज पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा घेतला. तसेच या आराखड्यामध्ये प्रस्तावित विकास कामांचे परिपूर्ण सादरीकरण होईल, याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.
यावेळी खासदार भावना गवळी, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कोपर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, सहाय्यक वनसंरक्षक आर. बी. गवई, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, आर्किटेक्ट हबीब खान, डॉ. शाम जाधव आदी उपस्थित होते.
पोहरादेवी विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देण्याच्या अनुषंगाने दि. २९ जून २०१७ रोजी मुंबई येथे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पोहरादेवी येथे पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये निधीतून होणाऱ्या विकास कामांविषयीच्या आराखड्याचे सादरीकरण होणार आहे.
*****
Comments
Post a Comment