वृक्ष लागवड, संवर्धनासाठी पुढाकार घ्या - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी


·        ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम पूर्वतयारी आढावा
·        प्रत्येक व्यक्तीने एक तरी झाड लावण्याचे आवाहन
·        सात दिवस चालणार वृक्ष लागवड महोत्सव
वाशिम, दि. ३० : वृक्षांचे प्रमाण कमी होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे शासनामार्फत ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत यावर्षी राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्याला ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच ५ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्थानीही पुढाकार घेऊन वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज केले. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, विभागीय वन अधिकारी के. आर. राठोड, सहाय्यक वन संरक्षक आर. बी. गवई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, लघुपाटबंधारे विभागचे कार्यकारी अभियंता जयंत शिंदे यांच्यासह सर्व तहसीलदार, शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, वृक्षारोपण मोहिमेच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणास हातभार लावण्याची संधी प्रत्येकाला मिळत आहे. या संधीचा फायदा घेऊन प्रत्येकाने दि. १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निश्चय करावा. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक असून त्यासाठी प्रत्येकाच्या कृतीशील प्रयत्नांची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन आपले योगदान द्यावे. गतवर्षी कारंजा तालुक्यातील भामदेवी व मंगरूळपीर तालुक्यातील पारवा येथील ग्रामस्थांनी वृक्ष लागवड मोहिमेत चांगली कामगिरी केली होती. तसेच येथील झाडांचे संवर्धनही चांगल्या पध्दतीने झाले आहे. इतर गावांमधील ग्रामस्थांनीही अशाच प्रकारे वृक्ष लागवडीमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
भामदेवी, पारवा येथील झाडांचा साजरा होणार वाढदिवस
गतवर्षी १ जुलै रोजी वृक्ष लागवड मोहिमेमध्ये सहभागी होत कारंजा तालुक्यातील भामदेवी येथील ग्रामस्थांनी प्रत्येकी एक याप्रमाणे २५०० रोपांची लागवड केली होती. त्यांच्या या उपक्रमाचे सुप्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनीही भेट देऊन कौतुक केले होते. तसेच मंगरूळपीर तालुक्यातील पारवा येथेही ग्रामस्थांनी एकत्रित येऊन सुमारे ३५०० रोपांची लागवड केली होती. या दोन्ही ठिकाणच्या झाडांना १ जुलै २०१७ रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याने याठिकाणी झाडांचा केक कापून वाढदिवस साजरा होणार आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे