वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित




·        आता जिल्हास्तरावर मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र
वाशिम, दि. २१: राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हास्तरावर जात प्रमाणपत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून वाशिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय सुरु झाले. समिती कार्यालयाचे उदघाटन समितीचे अध्यक्ष आय. एम. तिटकारे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपायुक्त तथा समितीचे सदस्य बी. डी. खंडाते, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा समितीच्या सदस्य सचिव माया केदार, विशेष निरीक्षक श्री. मुसळे आदी उपस्थित होते. श्री. तिटकारे यांच्या हस्ते फीत कापून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन झाले.
याप्रसंगी श्री. तिटकारे म्हणाले, लोकांच्या सोयीसाठी जिल्हास्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आजपासून वाशिम जिल्ह्यात ही समिती कार्यान्वयित झाली असून समितीचे दैनदिन कामकाज आता वाशिममध्ये चालणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी ही समिती सुरु झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी दाखल करण्यात आलेली प्रकरणे तातडीने निकाली काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाशिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सुरु झालेल्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीकडे आपले परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
समितीचे सदस्य श्री. खंडाते यांनी प्रास्ताविकामध्ये समितीच्या कार्यपध्दतीविषयी माहिती दिली. तसेच जिल्हा स्तरावर सुरु झालेल्या या समितीच्या माध्यमातून पारदर्शकपणे व अधिकाधिक तत्परतेने लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी समिती प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली. सहाय्यक आयुक्त तथा समितीच्या सदस्य सचिव श्रीमती केदार यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रलंबित प्रकरणांचे प्रमाणपत्र वाटप वाशिममध्येच होणार
            यापूर्वी ज्या नागरिकांनी अकोला येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्या सर्व नागरिकांची जात पडताळणी प्रमाणपत्राचे वितरण वाशिम येथूनच केले जाणार आहे. त्यामुळे यापूर्वी अकोला येथे प्रस्ताव दाखल केलेल्या नागरिकांनाही अकोला येथे जाण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आय. एम. तिटकारे यांनी दिली.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे