डाव्या हाताच्या बोटास शाई असल्यास मतदानाकरिता तहसीलदारांची परवानगी आवश्यक - विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता



·        दिनांक २६ नोव्हेंबरपर्यंत घेता येईल परवानगी
·        उजव्या हातास शाई असल्यास परवानगीची गरज नाही
वाशिम, दि. २२ : जुन्या पाचशे रुपये व एक हजार रुपयांच्या नोटा बदलून देत असताना जिल्ह्यातील काही बँकांमध्ये ग्राहकांच्या बोटांना शाई लावण्यात आली आहे. यामध्ये नजरचुकीने डाव्या हाताच्या बोटाला शाई लावली गेली असल्यास अशा व्यक्तीला नगरपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी तहसीलदारांचे ना हरकत अथवा परवानगी पत्र घेणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नगरपरिषद निवडणूक आढावा बैठकीत सांगितले.
याप्रसंगी जिल्हा निवणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व इतर संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. गुप्ता म्हणाले की, बँकांमध्ये हाताच्या बोटांना शाई लावण्यात आल्याने काही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असण्याची शक्यता आहे. मात्र अशा मतदारांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. ज्या मतदारांच्या उजव्या हाताच्या बोटाला बँकेमध्ये शाई लावण्यात आली आहे, अशा मतदारांना नगरपरिषदेसाठी मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही. मात्र ज्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला शाई लावली गेली आहे, अशा मतदारांनी मतदान करण्यास परवानगी मिळण्यासाठी दिनांक २६ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करावा. त्यानुसार संबंधिताला तहसीलदारांनी मतदान करण्यास परवानगीचे दिल्यानंतर त्या व्यक्तीला दिनांक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान करता येईल. याकरिता दिनांक २६ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर व प्रत्यक्ष निवडणुकीदिवशी आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच तहसीलदारांकडे अर्ज करताना स्वतः मतदार उपस्थित असणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्त श्री. गुप्ता यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे