खादी कपड्यांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करा - विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता




·        जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दालन सुरु
·        गुरुवारपर्यंत खादी वस्त्र खरेदीची संधी
वाशिम, दि. 22 : खादी कपडे तयार करणाऱ्या कारागिरांना रोजगार मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादी कापडांचा सर्वांनी वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार खादी कपड्यांची खरेदी करून खादीचा वापर वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे अमरावतीचे विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरु करण्यात आलेल्या खादी वस्त्र विक्री दालनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, भूसंपादन अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. पी. वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त श्री. गुप्ता यांनी फीत दालनाची फीत कापल्यानंतर स्वतः खादी शर्टची खरेदी करून अनोख्या पध्दतीने खादी विक्री दालनाचे उदघाटन केले. या विक्री दालनात सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना धनादेशाद्वारे कपड्यांची खरेदी करता येईल. मात्र त्यांना आपल्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सोबत देणे आवश्यक आहे.
विभागीय आयुक्त श्री. गुप्ता म्हणाले की, खादी उद्योगांमुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. तसेच यामाध्यमातून उपलब्ध होणाऱ्या कपड्यांचा दर्जाही अतंत्य चांगला असून कमी किंमतीमध्ये हे कापड मिळते. त्यामुळे ग्राहकांचाही फायदा होतो व खादी वस्त्र निर्मिती करणाऱ्या कारागीरांनाही रोजगार मिळतो. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योगच्या माध्यमातून इतर अनेक दर्जेदार वस्तूंचे उत्पादन होते. त्यामुळे ग्राहकांनी खादी उद्योगातील वस्त्रांबरोबरच इतर उत्पादनांचीही खरेदी करावी. राज्य शासनाने सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्येक सोमवारी खादी कपडे वापरण्याचे आवाहन करणारे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खादी कापडांचा वापर सुरु करावा. तसेच आपले नातेवाईक, मित्र यांनाही खादी वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, राज्य शासनाने सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येक सोमवारी खादी कपड्यांचा वापरा करण्याचे आवाहन केले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्व नागरिकांना वाशिम जिल्ह्यामध्ये खादी कपडे खरेदी करण्यासाठी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने तीन दिवसांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खादी वस्त्र विक्री दालन सुरु राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी याचा लाभ घेऊन खादी कपड्यांची खरेदी करावी.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे