मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे
·
जिल्हा
न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
वाशिम, दि. ०५ : मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला
साहित्यिकांनी विपुल लेखन केले आहे. त्यांचे हे लेखन मराठी साहित्याला समृद्ध
करण्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान देणारे असल्याचे प्रतिपादन प्रा. लता जावळे
यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वाशिम जिल्हा विधीज्ञ मंडळ यांच्यावतीने
‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्ताने ५ जानेवारी रोजी आयोजित ‘मराठी साहित्यामध्ये महिला
साहित्यिकांचे योगदान’
या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वरिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश पी.
एच. नेरकर होते.
यावेळी प्रमुख
पाहुणे म्हणून ॲड. शाम शेवलकर, ॲड. गणेशप्रसाद अवस्थी यांची उपस्थिती होती.
प्रा.
जावळे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून
दिल्यानंतर अनेक महिलांनी साहित्य निर्मितीत योगदान देण्यास सुरुवात केली. अगोदर
केवळ बोली स्वरुपात असलेली लोकगीते, गाणी शब्द रुपात आली. साहित्याच्या माध्यमातून
महिलांवर होणारा अन्याय, त्यांच्या वेदना शब्द रुपात मांडण्याचे काम महिला
साहित्यिकांनी केले. काही महिला साहित्यिकांनी अन्यायकारक रूढी, परंपरांविरुद्ध
साहित्य तयार करून आवाज उठविला. महिला साहित्यिकांनी निर्माण केलेल्या
साहित्यामधून समाज जीवनाचे वास्तवदर्शी प्रतिबिंब प्रभावीपणे मांडले गेले.
साहित्य
क्षेत्रात निर्माण झालेल्या सर्वच वैचारिक प्रवाहांमध्ये महिला साहित्यिकांनी
विपुल लेखन केले आहे. त्यांच्या स्त्रीवादी साहित्यामुळे महिलांचे दुःख समाजासमोर
आले. तसेच बहिणाबाई चौधरी यांच्यासारख्या कवियत्रींच्या कविता ह्या समाजाला मिळालेले
खूप मोठे देणे असल्याचे प्रा. जावळे यांनी सांगितले. जिल्हा न्यायालयाने मराठी
भाषा संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार हा सुखावणारा असल्याचेही त्या यावेळी
म्हणाल्या.
न्या.
नेरकर म्हणाले, आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेल्या
या भाषेकडे आज आपले दुर्लक्ष होत आहे. देशातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या चार भाषांमध्ये
मराठी भाषेचा समावेश होतो. वारकरी संप्रदायाने या भाषेला समाज प्रबोधनाचे साधन
मानले. मराठी या लोकभाषेतून ग्रंथ निर्मिती करून, कीर्तने व प्रवचने देवून या
भाषेचे महत्व अधोरेखित केले. आपणही मराठी भाषेचा आदर करून तिला सन्मान मिळवून दिला
पाहिजे.
ॲड. शेवलकर
म्हणाले, प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेच्या वापरला प्राधान्य दिले पाहिजे. मात्र
दुर्दैवाने आज असे घडत नाही. आज आपण मराठीमध्ये इतर भाषेतील शब्दांचा वापर केल्याशिवाय
आपला संवाद पूर्ण होत नाही. याबाबत प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपल्या मातृभाषेने
आपल्याला खूप काही दिले आहे, आपणही तिच्यावर प्रेम केले पाहिजे, असे मत त्यांनी
यावेळी व्यक्त केले.
ॲड. अवस्थी
म्हणाले, जिल्हा न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात
विविध उपक्रमांमुळे मराठी भाषेची महती समजण्यास मदत होत आहे. तसेच मराठी भाषेच्या
संवर्धनासाठी आपणही काहीतरी देणे लागतो, त्याची जाणीव सुध्दा मनामध्ये निर्माण
झाली आहे. त्यामुळे भविष्यात न्यायालयीन कामकाज व दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा
वापर अधिकाधिक होण्यासाठी नक्कीच मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला
न्या. एस. बी. पराते, न्या. एस. पी. शिंदे, न्या. डॉ. श्रीमती यु. टी. मुसळे,
न्या. श्रीमती के. बी. गीते, न्या. एस. पी. बुंदे,
न्या. एम. एस. पोळ, न्या. एस. पी. वानखडे,
जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड अजयकुमार बेरिया, उपाध्यक्ष ॲड. अमरसिंह रेशवाल, कोषाध्यक्ष श्रध्दा अग्रवाल
यांच्यासह विधीज्ञ मंडळी, पक्षकार, न्यायालयातील कर्मचारी बहुसंख्येने
उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार ॲड. गीतांजली गवळी यांनी मानले.
Comments
Post a Comment