मतदारांनी ‘व्हीव्हीपॅट’ची कार्यप्रणाली समजून घ्यावी - विभागीय आयुक्त पीयूष सिंह





·         चांभई येथे मतदानाचे प्रात्यक्षिक
·         ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या वापराविषयी जनजागृती
·         नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशिम, दि. ०३ :  आगामी लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्रांवर मतदानाच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करून ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या वापराविषयीची माहिती दिली जात आहे. या प्रात्यक्षिकाद्वारे मतदारांनी व्हीव्हीपॅटची कार्यप्रणाली समजून घ्यावी. त्यामुळे ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रीयेविषयीचे त्यांचे गैरसमज दूर होतील, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी केले. मंगरूळपीर तालुक्यातील चांभई येथे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, नायब तहसीलदार सुभाष जाधव, मोहन पांडे, सरपंच गजानन खरवडे, पोलीस पाटील दिनेश फुके, दिलीप फुके आदी उपस्थित होते.
श्री. सिंह म्हणाले, ईव्हीएमविषयी काही मतदारांच्या मनात गैरसमज निर्माण झाल्याने त्यांच्याकडून संपूर्ण मतदान प्रक्रियेविषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र आता ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर होणार असल्याने प्रत्येक मतदाराला आपण दिलेले मत अचूक नोंदविले गेले किंवा नाही हे पाहता येणार आहे. त्यामुळे मतदारांचे सर्व गैरसमज दूर होतील. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटच्या वापराची प्रक्रिया मतदारांना समजावून सांगण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर जनजागृती केली जात असून यामाध्यमातून मतदारांना ईव्हीएमविषयी वाटणाऱ्या प्रत्येक शंकेचे समाधान केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सुचनेनुसार मतदारांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या वापराविषयी माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर जनजागृती कार्यक्रम घेवून मतदानाचे प्रात्यक्षिक आयोजित केले जात आहे. या प्रात्यक्षिकामध्ये जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होवून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची कार्यप्रणाली समजून घ्यावी. तसेच याबाबत कोणतीही शंका असल्यास उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्याचे समाधान करून घ्यावे.
मंडळ अधिकारी डी. जे. चौधरी व ए. व्ही. वाडेकर यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत माहिती दिली. तसेच यावेळी घेण्यात आलेल्या मतदानाच्या प्रात्यक्षिकात उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या दोन्ही यंत्रांविषयीची माहिती जाणून घेतली.
मन्नासिंग चौक येथेही जनजागृती कार्यक्रम
            ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत माहिती देण्यासाठी आज दुपारी वाशिम शहरातील मन्नासिंग चौक येथेही जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी सुद्धा विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी भेट देवून उपस्थित मतदारांशी संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार बळवंत अरखराव आदी उपस्थित होते.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे