पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत ८६ तक्रारींचे निवारण



·        मंगरूळपीर उपविभागस्तरीय विस्तारित समाधान शिबीर
·        खचलेल्या विहिरींचे प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे निर्देश
·        अर्धन्यायिक प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना
वाशिम, दि. २५ : नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगरूळपीर येथे आयोजित करण्यात आलेल्या उपविभागस्तरीय विस्तारित समाधान शिबिरात ८६ तक्रारींचे निवारण करण्यात आले. पालकमंत्री ना. राठोड यांनी सर्व तक्रारदारांशी व्यक्तीशः संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे समाधान केले.
यावेळी खासदार भावनाताई गवळी, मंगरूळपीरच्या नगराध्यक्ष डॉ. गजाला खान, पंचायत समिती सभापती निलिमा देशमुख, जिल्हा परिषद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वनाथ सानप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, तहसीलदार के. बी. सुरडकर यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
समाधान शिबिरामध्ये अरक, कंझरा, पारवा व इतर काही गावांमधील शेतकऱ्यांनी सन २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींची दुरुस्ती करण्याबाबत तक्रारी अर्ज सादर केले होते. सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी पालकमंत्री ना. राठोड यांनी यावेळी जाणून घेतल्या. तसेच गट विकास अधिकारी व्ही. एफ. राठोड यांच्याकडून वस्तुस्थितीची माहिती घेतली. तसेच याप्रकरणातील पात्र शेतकऱ्यांच्या विहीर दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून त्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मंजुरी घेण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना गट विकास अधिकारी श्री. राठोड यांना दिल्या.
काही शेतकऱ्यांनी शिवार रस्ते, पांदन रस्ते खुले करण्याबाबत तक्रारी सादर केल्या होत्या. यापैकी काही प्रकरणांमध्ये अर्धन्यायिक सुनावणी सुरु असल्याने ही प्रकरणे प्रलंबित असल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आले. शेतीसाठी रस्ता उपलब्ध नसल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते, तसेच त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्ते विषयक अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये जलद गतीने सुनावणी घेऊन अशी प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
सातबारा संगणकीकरणमध्ये नवीन सोनखास येथील तलाठी विलंब करीत असल्याची तक्रार समाधान शिबिरात प्राप्त झाली होती. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित तलाठ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचनाही पालकमंत्री ना. राठोड यांनी दिल्या. तसेच आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याने बोगस तक्रार अर्ज सादर करून जमीन खरडून गेल्याप्रकरणी नुकसान भरपाईची मागणी केल्याचे यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याचावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
तीन महिन्यानंतर पुन्हा होणार समाधान शिबीर

महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्ह्यात तीनही उपविभागस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरांमध्ये सुमारे ९०० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. या शिबिरामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत झाली. त्यामुळे यापुढे प्रत्येक तीन महिन्याला समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. सर्व शासकीय विभागांच्या जिल्हास्तरीय एकत्र आणून नागरिकांच्या जास्तीत जास्त तक्रारींचा जलद गतीने निपटारा करण्यास यापुढेही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे