११ हजार विद्यार्थ्यांनी, महिलांनी मानवी साखळीतून साकारले भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह










विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

·        ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली नोंद
·        वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
·        मतदार जागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत अनोखा उपक्रम
·         
वाशिम, दि. १५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा म्हणून मतदार जागृतीसाठी आज वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर सुमारे ११ हजार विद्यार्थी, महिलांनी एकत्र येत मानवी साखळीतून भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह (लोगो) साकारला. ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जागतिक विक्रम म्हणून या उपक्रमाची नोंद झाली असून यामुळे वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी मतदान होत असून यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजवावा, यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह मानवी साखळीतून साकारण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, अंगणवाडीसेविका, बचत गटातील महिला, आशा कर्मचारी, महिला यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हामध्ये असलेल्या हिरवा, पांढरा, केशरी, काळा व करड्या रंगाच्या टोप्या परिधान करून सर्व विद्यार्थी, महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, सुदाम इस्कापे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा ‘स्वीप’चे सहाय्यक नोडल अधिकारी सुभाष राठोड, नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अनंत मुसळे यांच्यासह विविध शाळांचे मुख्ध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

पथनाट्य, घोषणामधून मतदार जागृतीचा संदेश

‘मतदान आपला अधिकार, नका घालवू वाया...’ ‘वोट डालने जाना है, अपना फर्ज निभाना है’ ‘बुढे हो या जवान, सभी करे मतदान’ ‘छोडो अपने सारे काम, चलो करे पहले मतदान’ अशा घोषण देत विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचा संदेश दिला. यावेळी बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मतदार जागृतीविषयक पथनाट्य सादर केले. तसेच शाहीर धम्मानंद इंगोले व त्याच्या चमूने लोकगीतातून मतदार जागृतीचा संदेश दिला.

मतदान करा, लोकशाही बळकट करा : जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

मतदार जागृतीसाठी आयोजित मानवी साखळीतून निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह साकारण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे ११ हजार विद्यार्थी, महिलांनी या उपक्रमात सहभाग घेवून निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह साकारले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत मतदार जागृतीचा संदेश पोहोचण्यास मदत होईल. येणाऱ्या २१ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा, कोणतेही कारण न देता मतदान करावे. विशेषतः महिला व दिव्यांग मतदारांनी अवश्य मतदान करावे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर, रँप, स्वयंसेवक, आवश्यकतेनुसार मोफत वाहतूक व्यवस्था आदी सुविधा देण्यात येणार आहेत. तरी प्रत्येक मतदार बांधवांनी मतदान करावे, लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी यावेळी केले.

जिल्हा प्रशासनामार्फत सलग तिसऱ्या वर्षी जागतिक विक्रमाची नोंद

मतदार जागृतीसाठी आज जिल्हा निवडणूक यंत्रणेने आयोजित केलेल्या उपक्रमात सुमारे ११ हजार विद्यार्थी, महिलांनी सहभाग घेतला. या विक्रमाची जागतिक विक्रम म्हणून ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत सलग तिसऱ्या वर्षी जागतिक विक्रम नोंदविला गेला आहे. यापूर्वी २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ७ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मानवी साखळीद्वारे स्वच्छ भारत अभियान’चा लोगो (महात्मा गांधी यांचा चष्मा) साकारला होता. त्यानंतर ८ मार्च २०१८ रोजी ८३१८ महिला व मुलींनी मानवी साखळीतून बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानचा लोगो साकारून विक्रम स्थापित केला होता.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे