मतदान प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्वाची - प्रकाश बिंदू





विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९

·        सूक्ष्म निरीक्षकांची कार्यशाळा
वाशिम, दि. १५ : मतदान केंद्रांवर नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांवर निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असते. मतदान प्रक्रिया शांतता व निःपक्षपातीपणे पार पाडण्यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची असून सर्व सूक्ष्म निरीक्षकांनी सजग राहून काम करावे, अशा सूचना सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या सूक्ष्म निरीक्षकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, मनुष्यबळ व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी तथा अधीक्षक प्रशांत जाधव, श्री. बिंदू यांचे संपर्क अधिकारी तथा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांच्यासह ७१ सूक्ष्म निरीक्षकांची उपस्थिती होती.
श्री. बिंदू म्हणाले, मतदानादिवशी होणाऱ्या मॉक पोल’चे सूक्ष्म निरीक्षकांनी सजग राहून सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडत असल्याची खात्री करावी. त्याच बरोबर प्रत्यक्ष मतदान सुरु झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निकषानुसार मतदान केंद्रांवर सर्व कार्यवाही होत असल्याची खात्री करावी. मतदाराची ओळख पटविण्याची कार्यवाही, उमेदवार प्रतिनिधी नियुक्ती आदी बाबींची नोंद घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच मतदान केंद्रांवरील प्रत्येक घडामोडींचा विहित नमुन्यातील अहवाल बंद लिफाफ्यात सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एका सूक्ष्म निरीक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी श्री. काळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सर्व सूक्ष्म निरीक्षकांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश