महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी अंगणवाडीसेविकांचा पुढाकार




·        ‘स्वीप’ अंतर्गत उपक्रमात १ हजार १७४ अंगणवाडीसेविकांचा सहभाग
वाशिम, दि. १२ : जिल्ह्यातील महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अंगणवाडीसेविकांनी पुढाकार घेतला आहे. ‘स्वीप’ अंतर्गत आयोजित उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व १ हजार १७४ अंगणवाडीसेविका आपापल्या गावामध्ये मतदार जागृती करीत असून विशेषतः महिला मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करीत आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडीसेविकांच्या माध्यमातून गावागावातील महिलांपर्यंत मतदार जागृतीचा संदेश पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अंगणवाडीसेविकांना मतदार जागृतीसाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. गावांमधील प्रमुख कार्यालये, शाळा, महाविद्यालयांच्या इमारतींवर मतदार जागृतीचा संदेश देणारी पोस्टर्स अंगणवाडीसेविकांमार्फत लावण्यात येणार आहेत. तसेच गावस्तरीय अधिकारी, कर्मचारी, शाळा-महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी यांना खिशाला लावण्यासाठी बॅचचे वितरणही अंगणवाडीसेविका करणार आहेत. अंगणवाडीमध्ये येणाऱ्या चिमुकल्यांच्या माता, अंगणवाडीस्तरावरील माता समितीमधील महिला, तसेच गावातील इतर महिला मतदारांना प्रत्यक्ष भेटून २१ ऑक्टोंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन अंगणवाडीसेविकांमार्फत करण्यात येत असल्याचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश