शासन आपल्या दारी ’पोहा येथील शिबीरात 430 लाभार्थ्यांना लाभ




‘ शासन आपल्या दारी ’

पोहा येथील शिबीरात 430 लाभार्थ्यांना लाभ

        वाशिम, दि. 21 (जिमाका) : कारंजा तालुक्यातील पोहा येथील संत तुकाराम महाराज सभागृहात आज 21 जून रोजी शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आयोजित शिबीरात विविध विभागाच्या योजनांचा प्रचार-प्रसार करुन 430 विविध योजनेच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रत्यक्ष लाभाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार कुणाल झाल्टे होते. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी शालिकराम पडघान, तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी, पोहाच्या सरपंच शितल म्हसने, उपसरपंच रमेश पवार व मंडळ अधिकारी सी.डी. मनवर  यांची प्रमुख उपस्थिती होती.

            श्री. झाल्टे यांनी मार्गदर्शनातून शासन आपल्या दारी या उपक्रमाची माहिती दिली. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्री. पडघान यांनी ग्रामीण भागातील नागरीकांसाठी शासनाच्या विविध योजना असल्याची माहिती दिली. या योजनांची लाभार्थ्यांनी माहिती जाणून घेवून लाभ घेण्याचे आवाहन केले.

           यावेळी मान्यवरांच्या हस्ते महसुल विभागाअंतर्गत संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, शिधापत्रिका, विविध दाखले व सलोखा योजना आदीचा 127 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पंचायत विभागाअंतर्गत 53 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. यामध्ये दिव्यांगांना मदत वाटप, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सीआयएफ निधी वाटप, बचतगट कर्ज वाटप, शिलाई मशिन, शिक्षक विभागांतर्गत गुणगौरव प्रमाणपत्र वाटप, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व अन्य योजनांच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. आरोग्य विभागांतर्गत 133 लाभार्थ्यांना आभा कार्ड, गोल्डन कार्ड, एनसीडी व जननी सुरक्षा योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. 15 व्यक्तींची आरोग्य तपासणी या शिबीरात करण्यात आली. कृषी विभागाच्या वतीने 102 लाभार्थ्यांना बियाणे परवाना, स्पिंक्लर सेट, कांदा चाळ, रोटावेटरचा लाभ देण्यात आला. या शिबीरात एकूण 430 लाभार्थ्यांना विविध योजनेच्या लाभाचे वाटप करण्यात आले.   

          पोहा महसूल मंडळाअंतर्गत आयोजित या शिबीरामध्ये महसूल, पंचायत, कृषी, वीज वितरण, शिक्षण, पशुसंवर्धन, एकात्मिक बाल विकास, आरोग्य, वन व अन्य विभागांनी आपले स्टॉल लावून विविध शासकीय योजनांची माहिती नागरीकांना व लाभार्थ्यांना दिली. कार्यक्रमाला पोहा मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोहा मंडळातील नागरीक व लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तलाठी श्री. वरघट यांनी केले. उपस्थितांचे आभार मंडळ अधिकारी सी.डी. मनवर यांनी मानले.   

                                                                                                                                             *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे