उत्पादन वाढीसाठी संतुलित खताचा वापर करा कृषी विभागाचे आवाहन




उत्पादन वाढीसाठी संतुलित खताचा वापर करा

कृषी विभागाचे आवाहन

        वाशिम, दि. 13 (जिमाका) : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकरी बियाणे व रासायनिक खतांची  खरेदी करत आहे. अशावेळी पिकाची व वाणाची निवड झाल्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे तसेच जमीन आरोग्य पत्रिकेनुसार रासायनिक खताची मात्रा देणे तेव्हढेच महत्वाचे आहे. दिलेले रासायनिक खत हे 100 टक्के पिकाला मिळत नसुन काही भाग हवेतुन, पाण्यातुन नष्ट होतो. तर काही भाग जमिनीत फिक्स होतो व पिकास उपलब्ध होत नाही. रायासनिक खते पिकास जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होण्याकरीता जमिनीत सेंद्रिय पदार्थ तसेच जिवाणुचे प्रमाण मोठया प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे.

           जमिनीत उपलब्ध असलेल्या सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण व नत्र म्हणजेच कर्ब नत्र गुणोत्तरावर रासायनिक खताच्या शिफारशीनुसार खत मात्रा देणे अवलंबुन असते. त्यानुसार सेंद्रिय कर्ब 0 ते 0.20 टक्के, नत्र 140 किलो प्रती हेक्टरीपेक्षा कमी, स्फुरद 0.15 किलो/ हे., पोटॅश 120 किलो/हे. पेक्षा जास्त असल्यास शिफारशीपेक्षा 50 टक्के रासायनिक खत मात्रा वाढवुन द्यावी. सेंद्रिय कर्ब 0.21 ते 0.40 टक्के, नत्र 41 ते 280 किलो/ हे. स्फुरद 5.01 ते 30 किलो / हे. पालाश 121 ते 180 किलो/ हे. असल्यास 25 टक्के खत मात्रा वाढवुन द्यावी. सेंद्रिय कर्ब 0.41 ते 0.60 टक्के, नत्र 281 ते 420 किलो/ हे., स्फुरद, 30.01 ते 50 किलो / हे., पालाश 181 ते 240 किलो/ हे. असल्यास शिफारशीनुसार खत मात्र द्यावी. सेंद्रिय कर्ब 0.61 ते 0.80 टक्के नत्र 421 ते 560 किलो / हे. स्फुरद 50.01 ते 65 किलो/ हे. पालाश 241 ते 300 किलो/ हे. असल्यास शिफारशीपेक्षा 10 टक्के कमी रासायनिक खत द्यावे. सेंद्रिय कर्ब 0.81 ते 1.00 टक्के, नत्र 561 ते 700 किलो/ हे, स्फुरद 65.01 ते 80 किलो/ हे. पालाश 301 ते 360 किलो/हे. उपलब्ध असल्यास रासायनिक खत शिफारशीपेक्षा 25 टक्के कमी द्यावे. सेंद्रिय कर्ब 1.01 टक्केपेक्षा जास्त, नत्र 700 किलो/ हे. पेक्षा जास्त, स्फुरद 80.01 किलो /हे. पेक्षा जास्त व पालाश 360 किलो/ हे. पेक्षा जास्त जमिनित उपलब्ध असल्यास शिफारशीच्या 50 टक्के रायायनिक खत मात्रा द्यावी. परंतू जमिनीत उपलब्ध असलेले नत्र, स्फुरद, पालाश पिकांना योग्य त्या स्वरुपात उपलब्ध होण्याकरीता जिवाणु संवर्धन रायझोबियम, अॅझॅटोबॅक्टर, पीएसबी व केएमवीची बिजप्रक्रिया 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे करणे आवश्यक आहे.

           माती परिक्षण करुन शेतात उपलब्ध घटकांचे प्रमाणानुसार रासायनिक खताची योग्य मात्रा ठरवुन देणे शक्य होवुन उत्पादन वाढीसह संतुलित खत वापरामुळे उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते. तरी जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवांनी जमीनीचे आरोग्य तपासणी करुन रासायनिक खताचा संतुलित वापर करावा. असे आवाहन प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे