सातबारावर सही शिक्का नसल्यास नाकारु नये बॅंकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



सातबारावर सही शिक्का नसल्यास नाकारु नये

बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

        वाशिम, दि. 09 (जिमाका) : जिल्हयात ई-फेरफार प्रणाली कार्यान्वयीत करण्यात आली आहे. सातबारा अभिलेख 100 टक्के डिजीटली स्वाक्षरीत करण्यात आले आहे. सातबारा अभिलेख कोणत्याही शेतकऱ्याला महत्वाच्या कामाकरीता वेळेवर प्राप्त होण्याकरीता शासनाने https://bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर तसेच सर्व सेतू केंद्र आणि तलाठी यांचेकडील डीडीएम लॉगीनला सातबारा अद्यावत करुन देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधीही आणि कुठेही सातबारा प्राप्त होवू शकतो.

            https://bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावरुन दोन प्रकारे सातबारा उपलब्ध होतो. एक प्रकारचा सातबारा हा फक्त माहितीसाठी आहे, तो इतर कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामाकरीता वापरु शकत नाही. दुसऱ्या प्रकारे निघणारा सातबारा म्हणजे डिजीटल स्वाक्षरीत सातबारा असल्यामुळे त्यावर तलाठी यांच्या सही शिक्क्याची आवश्यकता नाही. सेतू केंद्रावरुन प्राप्त होणारा सातबारा हा डिजीटल स्वाक्षांकित असल्यामुळे त्यावरसुध्दा तलाठी यांच्या सही शिक्क्याची आवश्यकता नाही. तलाठी यांच्या डीडीएम लॉगीनने निघणाऱ्या सातबारावर सही शिक्का मारु शकतात.

          परंतु काही बँकेचे अधिकारी हे शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देवून तलाठी यांच्या सही शिक्क्याच्या सातबाराची मागणी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांची कामे वेळेत होत नसल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे. तरी वरीप्रमाणे नमुद केल्यानुसार फक्त डिजीटल स्वाक्षरीत सातबारा आणि सेतूकडून निघणारा डिजीटल सातबारा यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तलाठी यांच्या सही शिक्का न मागता तो स्विकारण्यात यावा. तसेच तलाठी यांच्या डीडीएम लॉगीनने निघणाऱ्या सातबारावर तलाठी यांचा सही शिक्का मागू शकतात. परंतू नसल्यास तो देखील स्विकारण्यात यावा, तो नाकारण्यात येऊ नये. तरी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी त्यांच्यास्तरावरुन बँकांना कळवून सातबारावर सही शिक्का नसल्यास तो नाकारण्यात येऊ नये, तो स्विकारण्यात यावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागणार नाही. तरी शेतकऱ्यांना संबंधित बँक अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे