रोजगार मिळविण्यासाठी मानसिकता बदलविणे आवश्यक प्राचार्य प्रकाश जयस्वाल * वाशिम येथे महारोजगार मेळावा * मोठ्या संख्येने युवक व युवतींची उपस्थिती * 117 जणांची प्राथमिक निवड * विविध स्टॉलवरून रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन * 17 कंपन्यांचा सहभाग


रोजगार मिळविण्यासाठी मानसिकता बदलविणे आवश्यक
                 प्राचार्य प्रकाश जयस्वाल 

* वाशिम येथे महारोजगार मेळावा 

* मोठ्या संख्येने युवक व युवतींची उपस्थिती 

* 117 जणांची प्राथमिक निवड 

* विविध स्टॉलवरून रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन 

* 17 कंपन्यांचा सहभाग 


वाशिम दि 24 (जिमाका) रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत.पुण्या- मुंबईसारख्या शहरात तर कौशल्य आणि चांगले शिक्षण असेल तर कोणीही बेरोजगार राहत नाही.रोजगार मिळविण्यासाठी आपले घर, जिल्हा व प्रसंगी राज्याबाहेर जाण्याची तयारी असली पाहिजे. जिल्हयाबाहेर रोजगारासाठी जाणार नाही, ही मानसिकता आजच्या युवक युवतींनी बदलविणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा वाशिमच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश जयस्वाल यांनी केले.
            आज 24 जून रोजी वाशिम येथील श्री.शिवाजी महाविद्यालयातील आप्पासाहेब सरनाईक सभागृहात "शासन आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय आणि श्री शिवाजी महाविद्यालय,वाशिम यांच्या संयुक्त वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून श्री जयस्वाल बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण सरनाईक,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज व रोजगार व मार्गदर्शन अधिकारी सीमा खिरोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
             श्री.जयस्वाल पुढे म्हणाले, असे एक नाही तर शंभर मेळावे घेतले तरी मानसिकता बदलल्याशिवाय रोजगार उपलब्ध होणार नाही.आज तरुण-तरुणी बेरोजगार असताना, एक पैसाही मिळत नसताना अशा मेळाव्यातून रोजगाराच्या संधी बाहेर ठिकाणी कमी पैशात उपलब्ध झाल्या तर गेले पाहिजे. अशाप्रकारे उपलब्ध होणाऱ्या कामातून कामाचा अनुभव येत असतो. रोजगार मिळविण्यासाठी व तो टिकवून ठेवण्यासाठी परिश्रम करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे.रोजगार उपलब्ध होतात मोबदल्याची जास्त अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. जिथे तुम्ही काम करणार आहात तेथे प्रामाणिकपणे जीव ओतून काम करा. त्यामुळे भविष्यात चांगला रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रातील रोजगाराची निवड करावी. नोकरी करत असताना शिक्षण घेण्यात सातत्य ठेवा. रोजगाराच्या जशा भरपूर वाटा आहेत तशाच शिक्षणाच्या देखील मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
               श्री खडसे म्हणाले,आज बेरोजगारीचे प्रमाण मोठे असले तरी रोजगाराच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात आहे. बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी युवक युवतींमध्ये कौशल्य विकसित करून त्यांना विविध उद्योग व्यवसायातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. आपल्याकडे कौशल्य असतील तर आपण स्वतःपुरताच रोजगार प्राप्त न करता इतरांना त्यामधून रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या विविध महामंडळांसह अन्य महामंडळे रोजगार निर्मितीसाठी उद्योग व्यवसाय उभारण्यास मदत करण्यास प्रयत्नशील आहेत.तेव्हा आपण रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे व्हावे.तसेच रोजगारासाठी बाहेर जिल्ह्यात जाण्याची मानसिकता असावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.
                श्री.सरनाईक म्हणाले, महारोजगार मेळावा हा शासनाचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. त्यामुळे बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज शिक्षणाच्या क्षेत्रात स्पर्धा आहे. नोकरी सर्वांनाच मिळेल असे नाही. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे हा मेळाव्याचा उद्देश आहे. रोजगार मेळाव्यात लावण्यात आलेल्या स्टॉलला भेट देऊन आपल्याला कोणत्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होईल याची माहिती घ्यावी. विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींना मुलाखत देऊन आपली शैक्षणिक व अनुभवाची कागदपत्रे दाखवून कोणत्या कंपनीमध्ये आपली नियुक्ती होईल त्यासाठी प्रयत्नशील राहावे. कौशल्य प्राप्त केले तर रोजगार नक्की उपलब्ध होतो असे ते म्हणाले.
          मेळाव्यात जळगाव येथील नवकिसान बायो प्लॅनेट लिमिटेड, परम स्किल, जस्ट डायल,टाटा मोटर्स इंडिया,यशस्वी ग्रो,आर्म प्रायव्हेट लिमिटेड,जीएम इंडिया सिरॅमिक, क्रेडिट ऍसेस, नवभारत फर्टीलायझर, एलआयसी कार्यालय वाशिम, जीपी लिमिटेड वाशिम व व्यंकटेश ऑटोमोबाईल वाशिम आदी 17 उद्योगांचे प्रतिनिधी तरुण-तरुणींच्या मुलाखतीसाठी उपस्थित होते. विविध उद्योगासाठी 117 युवक-युवतींची प्राथमिक निवड करण्यात आली.
          यावेळी जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा खादी व ग्रामोद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक, भारतीय स्टेट बँक, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान नगर परिषद वाशिम,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ,वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ,महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, दिव्यांग विकास महामंडळ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या इंक्युबॅशन सेंटर, आयटीआय अप्रेंटिस आणि शासकीय तंत्रनिकेतन वाशिम विद्यालयाचे स्टॉल लावण्यात आले होते. स्टॉलवरून तरुण-तरुणींना रोजगार व स्वयंरोजगाराबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
           मेळाव्याला एक हजारपेक्षा जास्त युवक- युवतींची उपस्थिती होती.17 उद्योजक व शासनाच्या विविध विभागाचे व महामंडळाचे जवळपास 20 स्टॉल लावण्यात आले होते. रोजगारासाठी या महारोजगार मेळाव्यातून 117 युवक-युवतींची प्राथमिक निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले. संचालन शिक्षिका मंजुषा देशमुख यांनी तर उपस्थितांचे आभार दीपक बोळसे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे