जलयुक्तमधून नाला खोलीकरणाच्या कामांना प्राधान्य दया जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन जलशक्ती, जलयुक्त व गाळमुक्त योजनेचा आढावा



जलयुक्तमधून नाला खोलीकरणाच्या कामांना प्राधान्य दया

                                                               जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन

जलशक्ती, जलयुक्त व गाळमुक्त योजनेचा आढावा  

        वाशिम, दि. 13 (जिमाका) :  जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या 166 गावांमध्ये जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करतांना या अभियानातून नाला खोलीकरणाची कामे प्राधान्याने करण्यात यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

           आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलशक्ती अभियान, जलयुक्त शिवार व गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचा आढावा घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, लक्ष्मण मापारी, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिसा महाबळे, जिल्हा भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. कडू, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर व सखाराम मुळे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप कार्यकारी अभियंता निलेश राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

            श्री. षण्मुगराजन म्हणाले, जलशक्ती अभियान आराखडयातील कामे जलशक्ती अभियान पोर्टलवर अपलोड करावी. यंत्रणांनी या अभियानांतर्गत जल पुनर्भरणाची कामे व वृक्ष लागवडीची कामे मोठया प्रमाणात करावी. विहीर पुनर्भरणाची कामे देखील या अभियानातून करण्यात यावी. गावांमध्ये शोषखड्डयांची कामे करतांना गावात एकाच बाजूला सर्व घरापुढे शोषखड्डे तयार करण्यात यावे. खाजगी व सार्वजनिक इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात यावी. यंत्रणांना वृक्ष लागवडीचे दिलेले उदिष्ट पुर्ण करण्यात यावे. पारंपारीक पाणी साठयाच्या दुरुस्तीची कामेसुध्दा करण्यात यावी. नव्याने रोजगार हमी योजनेतून बांधण्यात आलेल्या विहीरीवर जलपुनर्भरणाची कामे करावी. शहरी भागात खाजगी व सार्वजनिक इमारती मोठया प्रमाणात असल्यामुळे रेन हार्वेस्टिंगची कामे मोठया प्रमाणात करण्यात यावी. असे ते म्हणाले.

            नदी किनाऱ्यावरील गावात नदी काठावरील मोकळया जागेत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यासाठी विशेष जाहिर सभा घेण्यात यावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, संबंधित गावात जुलै महिन्यात नियोजनातून वृक्ष लागवड करावी. गटविकास अधिकारी यांनी या विषयाच्या अनुषंगाने ग्रामसेवकांची सभा घेवून नदी काठावरील गावात नदी काठावर वृक्ष लागवड करावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.

           श्री. षण्मुगराजन पुढे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात ज्या गावांमध्ये अद्यापही कामे सुरु झालेले नाही. त्या गावातील कामांची तातडीने प्रशासकीय मान्यता घेवून ही कामे सुरु करावी. या अभियानात कामे करतांना निधीची कोणतीही अडचण येणार नाही. आवश्यकता असल्यास शासनाकडे निधीची मागणी करण्यात येईल. निधी कोणत्याही यंत्रणेने समर्पित करु नये. पावसाळयापूर्वी प्रत्येक तालुक्यात एक काम सुरु करावे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दयावे. त्यामुळे मोठया संख्येने शेतकरी गाळ शेतात टाकतील. गाळ काढण्यात आल्यामुळे तलावात मोठया प्रमाणात पाणीसाठा निर्माण होण्यास मदत होणार आहे. असे ते म्हणाले.

           श्रीमती पंत म्हणाल्या, गाळमुक्त धरण या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करुन घेतांना या योजनेचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दयावे. शेतकऱ्यांनी शेतात गाळ टाकल्यावर उत्पादनात झालेली वाढ ही बाब त्यांच्या लक्षात आणून दयावी. त्यामुळे अनेक शेतकरी तलावातील गाळ आपल्या शेतात टाकण्यास पुढे येतील. किती शेतकऱ्यांनी शेतात गाळ टाकला आहे, त्या शेतकऱ्यांची संख्या उपलबध करुन दयावी. गाळ टाकण्यापूर्वी होणारे उत्पादन आणि गाळ टाकल्यानंतर झालेले उत्पादन याची तुलनात्मक माहिती आपल्याला शेतकऱ्यांना देता येईल. असे त्या म्हणाल्या.

           जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने निती आयोगाच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाची 83 कामे जिल्हयात सुरु आहेत. त्यापैकी 57 कामे पुर्ण झाली आहे. 6 लाख 67 हजार घनमिटर गाळ काढण्यात आला आहे. उर्वरित कामे सुरु असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे