शासन आपला दारी'मांगुळ (झनक) शिबिरात लाभार्थ्यांना दिला योजनांचा लाभ





'शासन आपला दारी'

मांगुळ (झनक) शिबिरात लाभार्थ्यांना दिला योजनांचा लाभ

        वाशिम, दि. 22 (जिमाका) : रिसोड तालुकयातील मांगुळ (झनक) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज 22 जून रोजी 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत आयोजित शिबीरात विविध विभागाकडून त्यांच्या विभागाशी संबंधित योजनांचा प्रचार व प्रसार करुन केनवड व गोवर्धन मंडळातील विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वाटप आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीराच्या अध्यक्षस्थानी रिसोड तहलिसदार प्रतीक्षा तेजनकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून रिसोड पंचायत समितीच्या सभापती श्रीमती केसर हाडे, महादेव ठाकरे, जि.प. सदस्या पुजा भुतेकर, शोभा शेगोकार, अश्विनी तहकिक, पंचायत समिती सदस्या पुजा बोरकर, रतनजीतकार बाजड, भूषण दांदळे, गणेश साबळे, अर्चना वाघ, मांगुळ (झनक) येथील सरपंच व उपसरपंच यांची उपस्थिती होती.  
            आयोजित शिबीरात मार्गदर्शन करतांना आमदार श्री. झनक म्हणाले, शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ तात्काळ देण्यात येत आहे. लाभार्थ्यांना कोणत्या योजनांचा लाभ पाहिजे आहे. त्याबाबत संबंधित यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांशी लाभार्थ्यांनी संपर्क साधावा. या उपक्रमामुळे चेतना व ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

           श्री. ठाकरे यांनी रिसोड तालुक्यातील शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी. गरजू लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणांनी पोहचून त्यांना योजनांचा लाभ मिळवून दयावा. असे मत व्यक्त केले.

            श्रीमती तेजनकर म्हणाल्या, शासनाच्या अनेक योजना आहे. त्या योजनांची लाभार्थ्यांना माहिती नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून यंत्रणा आता लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे. आपल्याला कोणत्या योजनांचा लाभ पाहिजे यासाठी लाभार्थ्यांनी यंत्रणांना कळवून आवश्यक ती कागदपत्रे देवून योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.    

            शिबीरात महसूल, पंचायत, कृषी, वीज वितरण, शिक्षण, पशुसंवर्धन, एकात्मीक बाल व महिला विकास, आरोग्य, वन व इतर विविध विभागांनी स्टॉल लावून आपला सहभाग नोंदविला. शिबीरात विविध शासकीय योजनांची माहीती लाभार्थ्यांना व नागरीकांना देण्यात आली.

            यावेळी महसूल विभागाअंतर्गत संजय गांधी योजना, श्रावणबाळ, शिधापत्रिका, विविध दाखले, सलोखा योजनेच्या ३५० लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पंचायत विभागाअंतर्गत दिव्यांगांना मदत वाटप, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सीआयएफ निधी वाटप, बचतगट कर्ज वाटप, शिलाई मशिन वाटप, शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत गुणगौरव प्रमाणपत्र वाटप, एकात्मीक बाल विकास सेवा योजना, मनरेगा, व इतर योजनांसह एकूण ८२ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.
          आरोग्य विभागाच्या वतीने आभा कार्ड, गोल्डन कार्ड, एनसीडी, जेएसव्हीच्या ६२ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. आरोग्य तपासणी शिबीरात १५ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
           कृषी विभागाच्या वतीने ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, रोटावेटर, बियाणे परवाना, स्पिंक्लर सेट व कांदा चाळच्या १४० लाभार्थ्यांना लाभ वाटप. एकात्मिक बालविकास विभागाअंर्तगत बेबी कीट व पोषण आहाराच्या एकूण ५२ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वाटप करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
            या शिबीरात एकूण ७०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. केनवड व गोवर्धन मंडळातून एकूण ४७१७ लाभार्थ्यांना विविध विभागाच्या वतीने शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यासह संबंधित मंडळातील लाभार्थ्यांची व नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मंडळ अधिकारी सुनील लोखंडे यांनी केले. उपस्थितांचे आभार मंडळ अधिकारी श्री. मोहळे यांनी मानले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे