जमीन, पाणी व हवा खराब न करतापिकांच्या उत्पन्न वाढीसाठी नॅनो तंत्रज्ञानाची निर्मिती - उदय तिजारे नॅनो खत प्रशिक्षण कार्यक्रम
- Get link
- X
- Other Apps
जमीन, पाणी व हवा खराब न करता
पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी नॅनो तंत्रज्ञानाची निर्मिती
नॅनो खत प्रशिक्षण कार्यक्रम
वाशिम, दि. 01 (जिमाका) : पिकांना अन्न घटकांचा पुरवठा हा फवारणीच्या माध्यमातून नॅनो तंत्रज्ञानाने करायचा आहे. जेणेकरुन जमीन, पाणी व हवा खराब न होता पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी नॅनो तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात आली. असे प्रतिपादन इफकोचे राज्य विपणन व्यवस्थापक उदय तिजारे यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे इफको आणि कृषी विभाग यांच्या संयुक्तवतीने नॅनो खत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. तिजारे बोलत होते. मंचावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गणेश गिरी, कृषी व्यावसायीक संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटील व इफकोचे क्षेत्रिय अधिकारी सागर मेहेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती
श्री. तिजारे म्हणाले, नॅनो तंत्रज्ञानविषयक कार्यशाळा राज्यात सर्वप्रथम वाशिम येथे होत आहे. गेल्या तीन चार वर्षापासून नॅनो तंत्रज्ञानाविषयी चर्चा व्हायला सुरुवात झाली. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत सन 2021 ला पोहचले. 1970 च्या दशकात देशात पहिली हरितक्रांती झाली. त्यावेळी देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. परदेशातून अन्नधान्य मागवावे लागत होते. शासन, कृषी शास्त्रज्ञ व संशोधकांच्या अथक परिश्रमातून संकरीत वाण तयार करण्यात आले. हरितक्रांतीला पाठबळ देण्यासाठी इफको ही सहकारी संस्था पुढे आली. इफकोने सर्वप्रथम युरीया तयार करण्याचा कारखाना सुरु केला. त्यावेळच्या शेतकऱ्यांचा युरीयावर विश्वास नव्हता. शेतकरी शेतात युरीया टाकण्यासाठी तेंव्हा तयार होत नव्हते. या युरीयामुळे पिकांचे व जमीनीचे काय होईल ही भिती शेतकऱ्यांना वाटायची. उत्पादन चांगले येईल का, आलेले उत्पादन खाण्यालायक राहील का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर होते. सरकारने प्रयत्न करुन कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात रात्रीला युरीया फेकला. जेंव्हा शेतकऱ्यांना कळले की, युरीया दिल्यामुळे उत्पन्न वाढते त्यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसला. आज शेतकऱ्यांच्या कृषी केंद्रासमोर रांगा लागलेल्या आपल्याला दिसतात. परिस्थीती बदलली, ज्या युरीयावर शेतकऱ्यांचा विश्वास नव्हता. तो युरीया खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागलेल्या दिसतात. कालांतराने शेतकऱ्यांचा युरीयावर एवढा विश्वास बसला की, त्याचा अवास्तव गरजेपेक्षा जास्त वापर सुरु झाला. फक्त युरीयाच नव्हे तर इतरही खतांचा देखील जास्त वापर सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या देशात दरवर्षी 350 लाख टन रासायनिक खते लागतात. फक्त आपल्या देशात 230 लाख टन खते तयार होतात. 120 लाख टन खते आपल्याला विदेशातून आयात करावी लागते. असे सांगून, श्री. तिजारे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिने विदेशातून सरकार खते आयात करतात. शेतकऱ्यांना ही खते खरेदी करणे परवडणार नाही म्हणून त्यावर अनुदान दिले जाते. 266 रुपयाला शेतकऱ्याला 1 युरीयाची बॅग मिळते. त्या एका बॅगची किंमत 3200 ते 3300 रुपये आहे. जवळपास 3 हजार रुपये एका बॅगमागे सरकार अनुदान देते. रासायनिक खताचा वापर आज 9 पटीने वाढला आहे. उत्पादनात मात्र 3 पट वाढ झाली आहे. रासायनिक खतांची मात्रा देवून उत्पादन घटत आहे. यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले. रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमीनी खरात होत आहे. जमीनी खराब होत असल्याने उत्पादनात घट होत आहे. शेतीची उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे. पिकाला अन्न घटकांचा पुरवठा हा फवारणीच्या माध्यमातून करावयाचा आहे. जेणेकरुन जमीनी खराब होणार नाही आणि पिकाला अन्न घटक मिळून पिकाचे उत्पादन वाढेल. यासाठी फवारणीच्या माध्यमातून अन्न घटक पुरविण्यासाठी नॅनो तंत्रज्ञान विकसीत झाल्याचे ते म्हणाले.
फवारणीच्या माध्यमातून अन्न घटक पुरवायचे असतील ते पिकाला पुर्णपणे उपलब्ध झाले पाहिजे. असे सांगून श्री. तिजारे म्हणाले, जर ते पिकालाच मिळाले नाही तर उत्पादन कसे वाढणार म्हणून नॅनो तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे. हे तंत्रज्ञान एका दिवसात विकसीत झाले नसून यामागे शास्त्रज्ञनांचे मोठे परिश्रम व त्यांचे संशोधन आहे. देशातील विविध भागात 11 हजार ठिकाणी 94 पिकांवर याचे प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामधुनच नॅनो युरीया शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. पिकाला नत्राची मोठया प्रमाणात गरज असते. म्हणून नॅनो युरीयावर संशोधन झाले. याच संशोधनातून हा युरीया शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर नॅनो डीएपीवर संशोधन झाले. आणखी संशोधन सुरुच आहे. येणारे युग हे नॅनो युग असल्याचे त्यांनी सांगितले.
जमीनीतून कमीत कमी रासायनिक खते दयायचे. फवारणीच्या माध्यमातून अन्न द्रव्यांचा पुरवठा पिकांना करायचा. त्यामुळेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगून श्री. तिजारे म्हणाले, हे नॅनो तंत्रज्ञान गावोगावी पोहोचविण्यासाठी गावपातळीवरचा कृषी अधिकारी व शेतकऱ्यांचा ज्यांच्यावर विश्वास आहे असा किरकोळ विक्रेता यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. नॅनो खतांकडे सकारात्मक दृष्टिकोणातून बघणे गरजेचे आहे. जर जमीनी टिकल्या तर शेतकरी टिकेल, जर शेतकरी टिकला तर तुम्ही आम्ही जगू. आपल्या देशातील शास्त्रज्ञांनी तयार केलेला नॅनो युरीया शेतकऱ्यांनी वापरावा. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. नॅनो खत हे सर्व प्रकारच्या पिकांना चालणारे आहे. नॅनो खताचा वापर फवारणीच्या माध्यमातून करावयाचा आहे. फवारणीमुळे जमीनीशी संपर्क येत नाही. फवारणीतून पिकांना नत्र व स्फुरद मिळतात. नॅनो युरीया खत फवारणीमुळे त्यातील अन्न घटक वाया जात नाही. ते संपुर्णपणे पिकांना उपलब्ध होतात. नॅनो युरीयाची पहिली फवारणी पिकाच्या वाढीच्या अवस्थेत असतांना 30 दिवसांनी व दुसरी फवारणी पिके फुलांवर आल्यावर करावी. असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी देखील मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, जिल्हयातील शेतकरी आता भविष्यात नॅनो युरीयाचा वापर करतील. त्यामुळे जमीनीच पोत कायम राहून पिकाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. नॅनो युरीयाच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हयातील विविध शेतकरी उत्पादक कंपन्याचे सभासद, कृषी निविष्ठा विक्रेते, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. तिजारे यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी नॅनो युरीयाच्या वापराबाबत विचारलेल्या शंकांचे निराकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माच्या प्रकल्प संचालक श्रीमती महाबळे यांनी केले. संचालन स्मार्ट प्रकल्पाचे संतोष वाळके यांनी केले. उपस्थितांचे आभार सुनिल पाटील यांनी मानले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment