श्रीमती वसुमना पंत यांची शिवणी येथील सीएससी केंद्राला भेट
- Get link
- X
- Other Apps
श्रीमती वसुमना पंत यांची शिवणी
येथील सीएससी केंद्राला भेट
वाशिम, दि. 28 (जिमाका) : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा जिल्ह्यातील सर्वच पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र आणि सीएससी केंद्राच्या माध्यमातून आयुष्यमान भारतचे ई-कार्ड तयार करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी आज २८ सप्टेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड येथील ग्रामपंचायतमधील सीएससी केंद्राला भेट देऊन ई-कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, गटविकास अधिकारी श्री. अवगण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद भगत, बाल विकास प्रकल्प अधिकारी नितीन लुंगे व सरपंच लल्लू गारवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात. सर्व लाभार्थ्यांना सीएससी/आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ई-कार्ड मोफत तयार करून देण्याचे काम जिल्ह्यात सध्या सुरू आहे. ई-कार्ड तयार करून देण्याची प्रक्रिया या केंद्राच्या माध्यमातून वेगाने पूर्ण व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत यांनी शिवणी येथील सीएससी केंद्राला भेट दिली. ई-कार्ड तयार करण्यासाठी आलेले लाभार्थी आणि सीएससी केंद्र चालक यांच्याशी संवाद साधला.
श्रीमती पंत यांनी सीएससी केंद्राला भेटी दरम्यान ई-कार्ड तयार करण्याची प्रक्रिया केंद्र चालकाकडून जाणून घेतली. गावातील कोणताही पात्र लाभार्थी आयुष्मान भारत योजनेच्या ई-कार्डपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता सीएससी केंद्र चालकाने घ्यावी. अशा सूचना त्यांना दिल्या. गावात दवंडी देऊन गावातील सर्व पात्र व्यक्तींना ई-कार्ड तयार करुन घेण्यास प्रोत्साहित करण्याच्या सूचना देखील श्रीमती पंत यांनी यावेळी दिल्या. त्यांनी लाभार्थ्याची आवश्यक कागदपत्रे ई-कार्ड तयार करण्यासाठी कशाप्रकारे अपलोड केली जातात हे बघितले व त्याबाबतची माहिती सीएससी केंद्र चालकाकडून जाणून घेतली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment