मालेगाव येथून जिल्हास्तरीय पोषण महिन्याची सुरुवात*" सही पोषण देश रोशन " घोषणेने मालेगाव येथून पोषण महिन्याचा शुभारंभ**अंगणवाडी सेविकांना केळीच्या झाडाचे वाटप व रॅलीचे आयोजन*
मालेगाव येथून जिल्हास्तरीय पोषण महिन्याची सुरुवात
*" सही पोषण देश रोशन " घोषणेने मालेगाव येथून पोषण महिन्याचा शुभारंभ*
*अंगणवाडी सेविकांना केळीच्या झाडाचे वाटप व रॅलीचे आयोजन*
वाशिम दि.०२(जिमाका) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण उपक्रमात समावेश असलेल्या राष्ट्रीय पोषण कार्यक्रम ह्या अंतर्गत दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून महिला व बालकल्याण विभाग साजरा करतो.सप्टेंबर 2022 मध्ये महिला व बालकांचे आरोग्य,पोषण व शिक्षण,आदिवासी भागातील महिला व बालकांसाठी पारंपरिक खाद्यपदार्थ बनवणे,लिंग संवेदनशीलता व जलसंधारण व्यवस्थापन या चार प्रमुख संकल्पनावर आधारित पोषण अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांचे निर्देशानुसार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण श्री संजय जोल्हे यांचे मार्गदर्शनात जिल्हास्तरीय पोषण महिन्याची सुरुवात 1 सप्टेंबर रोजी मालेगाव प्रकल्पातून करण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण संजय जोल्हे व निती आयोगाचे विकासात्मक भागीदार पिरामल फाउंडेशनचे दिगंबर घोडके ,जिल्हा परिषद सदस्य कल्पनाताई राऊत, पंचायत समितीच्या उपसभापती श्रीमती घोडे, गटविकास अधिकारी किशोर काळपांडे,पंचायत समिती सदस्य रवींद्र देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री काळे तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
उपस्थित मान्यवरांनी पोषण महिन्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.पोषण महिन्यामध्ये घेण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमाची अंमलबजावणी प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम अंगणवाडी सेविका, आशा व प्रत्येक विभागाने करावे असे श्री. जोल्हे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले,
निती आयोगाचे जिल्हा समन्वयक दिगंबर घोडके यांनी पोषण अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप द्यावे व पोषणाचे महत्त्व प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन या ठिकाणी केले.यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य कल्पना राऊत, श्री रवींद्र देशमुख यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
अंगणवाडी सेविकांना केळीच्या वृक्षाचे वाटप करण्यात आले. प्रत्येक अंगणवाडीमध्ये पोषण वाटिका तयार व्हावी या उद्देशाने केळीच्या वृक्षाची वाटप केले.त्यानंतर किशोरवयीन मुली व लाभार्थींना सुद्धा केळीच्या झाडाचे वाटप करण्यात आले. यानंतर सर्व अंगणवाडी सेविकांची पोषण रॅली काढण्यात आली.रॅलीमध्ये " सही पोषण देश रोशन " च्या घोषणेने परिसर दुमदुमला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी किशोर काळपांडे यांनी केले.आभार बाल विकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका साधना इथापे, नंदा झळके ,मिनाक्षी सुळे तसेच दिलीप घुगे, रमेश कांबळे यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment