बीज प्रक्रीया करुनच रब्बी पिकांची पेरणी करा कृषी विभागाचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
बीज प्रक्रीया करुनच रब्बी पिकांची पेरणी करा
कृषी विभागाचे आवाहन
वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्हयात सोयाबीन पिकाच्या कापणीला सुरुवात झाली असून सलग सोयाबीन, मुग, उडीद पिकाचे क्षेत्र कापणी झाल्यानंतर शेतकरी बांधव रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन करतात. यामध्ये मुख्यतः हरभरा या रब्बी पिकास शेतकरी मोठया प्रमाणावर पसंती देतात. परंतू हरभऱ्याचे उत्पादन आणि बाजारातील दर याचा विचार करता हरभरापेक्षा करडई, मोहरी, जवस यासारखे कमी पाण्यावर येणारे व कमी मशागतीच्या पिकाची लागवड केल्यास हरभरा पिकापेक्षा निश्चीतच जास्त फायदा होईल. खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्त १०९ टक्के पाऊस झाल्यामुळे जमीनीत मुबलक प्रमाणात ओल असुन पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे रब्बी पिकाच्या क्षेत्रात निश्चितच वाढ होईल. हरभरा व गहु या पांरपारीक रब्बी पिके घेण्यापेक्षा काही प्रमाणात रब्बी ज्वारी, करडई, जवस, मोहरी व मसुर या सारखी पिके घेण्याचे नियोजन करावे. जेणेकरुन पिकाची फेरपालट होऊन अधिक नफा मिळण्यास मदत होईल.
रब्बी पिके पेरणी करण्यापुर्वी बियाण्यास रासायनिक व जिवाणू संवर्धनाची बिजप्रक्रिया करावी. यासाठी पुढीलप्रमाणे पिकनिहाय औषधे वापरावी. करडई- अॅझोटोबॅक्टर व पीएसबी जिवाणू संवर्धन २०० ग्रॅम + ट्रायकोडर्मा ४० ग्रॅम/ १० किलो बियाणे. जवस- कार्बनडांयझीम २ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम/ किलो बियाण्यास लावल्यानंतर तिन तासांनी अॅझोटोबॅक्टर २० ग्रॅम + पीएसबी २० ग्रॅम/ किलो बियाण्यास लावावे. मोहरी- पेरणीपुर्वी थायरम ३ ग्रॅम/ किलो बियाणे. गहू- थायरम किंवा व्हिटावॅक्स ७५ टक्के पाण्यात विरघळणारी बुकटी २.५ ग्रॅम/ किलो बियाण्यास लावल्यानंतर अॅझोटोबॅक्टर २० ग्रॅम + पीएसबी २० ग्रॅम / किलो बियाण्यास लावावे. हरभरा-कार्बोक्झील ३७.५ टक्के + थायरम ३७.५ टक्के (व्हिटावॅक्स) ३ ग्रॅम/ बियाणे किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा ६ मीली/किलो बियाण्यास लावल्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम + २५ ग्रॅम पीएसबी किंवा रायझोबियम ६ मीली + पीएसबी ६ मीली/ किलो बियाण्यास लावावे. कुठल्याही परिस्थितीत वरीलप्रमाणे औषधे व जिवाणू संवर्धने वापरुन बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment