श्री. नंदकुमार यांची धोडप ( बु) येथे भेट व ग्रामस्थांशी संवाद
श्री. नंदकुमार यांची धोडप ( बु) येथे भेट व ग्रामस्थांशी संवाद
वाशीम दि.३( जिमाका) अपर मुख्य सचिव (रोहयो व इतर मागास व बहुजन कल्याण विभाग) तथा जिल्ह्याचे पालक सचिव श्री. नंदकुमार यांनी आज ३ सप्टेंबर रोजी रिसोड तालुक्यातील धोडप (बु) या गावाला भेट देऊन गावातील सभागृहात उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.रिसोड पंचायत समितीच्या सभापती श्रीमती केशरबाई हाडे, सरपंच लता बोडखे, बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव श्री.साळुंखे,श्री. धांडे,पंचायत समिती सदस्य राहुल बोडखे, शिक्षणाधिकारी श्री. शिंदे समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारुती वाठ,प्रभारी गटविकास अधिकारी सोळंके, तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री. नंदकुमार ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले, यंदा देश स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करीत आहे. पुढील २५ वर्षात आपल्याला विकसित व्हायचे आहे. आपल्याला विकास करायचा आहे गावातील प्रत्येक कुटुंब हे लखपती झाले पाहिजे,यासाठी मनरेगातून अर्थात रोहयोतून काम करण्यात येत आहे. यामध्ये निधीची कमतरता नाही. अंगणवाड्यांचे बांधकाम मनरेगातून करण्यात येईल. मनरेगातून मत्ता निर्माण झाली पाहिजे.रोहयोअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेता येतो. मनरेगातून गुरांचा गोठासुद्धा बांधून देण्यात येतो.२६३ प्रकारची कामे मनरेगातून करण्यात येतात. पाच एकरपेक्षा कमी शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेतून लाभ देता येतो. मनरेगातून काम मिळविणाऱ्या जॉब कार्डधारकांची संख्या वाढली पाहिजे. यामधून मोठ्या प्रमाणात कुशल कामे करता येईल. मनरेगातून प्रत्येक व्यक्ती हा लखपती झाला पाहिजे. या योजनेतून त्याने आर्थिक उन्नती केल्यास त्याला कारसुद्धा सहज खरेदी करता येईल.असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.षण्मुगराजन म्हणाले, मनरेगाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. प्रत्येक गावात अनेक चांगली कामे झाली आहेत. अनेक शेतकरी शेतीतून यशस्वी झाले आहेत. गावपातळीवर विविध अडचणी व समस्या असतात, त्या सोडविण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक श्री.सोळंके यांनी केले. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तत्पूर्वी श्री. नंदकुमार यांनी वडजी या गावाला भेट देऊन बकरीपालन करणाऱ्या कुटुंबांशी चर्चा विस्तृत करून या व्यवसायाबाबतची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली.
Comments
Post a Comment