रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठीआवश्यक उपाययोजना करा -षण्मुगराजन एस.



रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी

आवश्यक उपाययोजना करा

                                                 -षण्मुगराजन एस.

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सभा

       वाशिम, दि. 27 (जिमाका) : जिल्हयातून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्ग जातात. या मार्गावरुन जाणारी वाहने भरधाव वेगाने मार्गक्रमण करतात. संबंधित विभागाने आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक बसविण्याची कार्यवाही करण्यासाठी घटनास्थळी भेट दयावी. गतीरोधक दर्शविणारे फलक लावून रस्त्यांवरील असलेले खड्डे बुजविण्याचे काम प्राधान्याने करावे. अपघात घडल्यास जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन दयावे. संबंधित यंत्रणांनी रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी दिले.

          जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची सभा 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम., अतिरिक्त पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकट मिठ्ठेवाड, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक मोरे व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सैय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.

          श्री. षण्मुगराजन म्हणाले, महामार्ग पोलीस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागाला वाहनांवर कारवाई करण्याचे उदिष्ट निश्चित केले आहे. संबंधितांनी बाबनिहाय कारवाई करुन आपले उदिष्ट पूर्ण करावे. स्पीडगनच्या आधारे वेगवान धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. त्यामुळे रस्ता सुरक्षा करता येईल. एखादया विशिष्ट ठिकाणी कॅमेरे लावून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. एखादया अपघातास वाहनाचा तांत्रिक दोष असल्यास त्याची तपासणी करुन अहवाल तयार करावा. वाशिम शहरातील सर्व पाच सिग्नल कार्यान्वीत राहतील याकडे नगरपालिका व वाहतूक शाखेने लक्ष दयावे. एखादया मार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना ताबडतोब रुग्णवाहिका उपलब्ध झाली पाहिजे. पुसद चौकात रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहे ते तातडीने दुरुस्त करावे. तसेच अकोला नाका ते पुसद चौक तसेच हिंगोली मार्गावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी. असे त्यांनी सांगितले.

          पुसद चौकात अवैध प्रवाशी वाहतूकीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पोलीस वाहतूक शाखेने विशेष लक्ष देऊन प्रवाशांची व तेथील नागरीकांची गैरसोय टाळावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, अपघातात जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना बक्षीस देण्याची कार्यवाही करावी. त्यामुळे समाजात चांगला संदेश जाईल. असे ते म्हणाले.

          श्री. हिरडे यांनी समिती सभेच्या अनुषंगाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. मंगरुळपीर तालुक्यातील मोझरी, तपोवन येथील अपघातस्थळी रंबरल स्ट्रिप टाकणे, ब्रिंकर लावणे, सेंटर पट्टा लावणे, गतीरोधक लावणे, पुढे गाव आहे हे दर्शविणारे फलक लावणे, झाडाच्या अनावश्यक फांदया कापणे, कॅट आईज बसविणे, वाशिम तालुक्यातील आसोला या अपघात ठिकाणी गतिरोधक लावणे, सेंटर पट्टा लावणे, रोड शोल्डर भरणे, स्पिडलिमीट बोर्ड लावणे आदी उपाययोजना तातडीने करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या गावातून येणाऱ्या छोटया रस्त्यावर, शहरात व तालुक्याच्या ठिकाणी गतिरोधक व वाहतूक चिन्ह बसविणे व अवैध गतिरोधक काढण्याविषयी, खाजगी प्रवाशी बसेसकरीता पिकअप अँड ड्रॉप पाँईट निश्चित करणे, महिंदा मॅक्झीमम, सुप्रो व टाटा मॅजीक इत्यादी वाहनातून अवैध प्रवाशी वाहतूकीमुळे होणारे अपघात व त्यावर आळा घालण्याबाबत, गतिरोधक बसविण्याबाबतच्या नविन प्राप्त प्रस्तावाबाबत तसेच मंगरुळपीर शहरातील राष्ट्रीय महामार्ग 161 ए आणि 161 ई या रस्त्यावर वाहतूकीसाठी ॲटोमॅटीक सिग्नल व्यवस्था करण्याबाबत या सभेत चर्चा करण्यात आली.

          सभेला राष्ट्रीय महामार्ग वाशिमचे प्रकल्प संचालक, महामार्ग पोलीस अमानीचे पोलीस निरीक्षक, औरंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अमरावतीचे उपविभागीय अधिकारी व जिल्हा सूचना अधिकारी यांची उपस्थिती होती.        

                                                                                                                                          *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे