पी.एम.किसान सन्मान योजना ई - केवायसीत वाशीम राज्यात अव्वल

पी.एम.किसान सन्मान योजना
ई - केवायसीत वाशीम राज्यात अव्वल

वाशिम दि.८ (जिमाका) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यांच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र शेतकरी वंचित राहू नये,यासाठी ई - केवायसी करण्याच्या जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ३५१ शेतकऱ्यांनी ई - केवायसी प्रक्रिया ८ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली आहे.आता केवळ २५ हजार २४ शेतकऱ्यांची ई -केवायसी करणे बाकी आहे. पी. एम.किसान सन्मान निधी योजनेत ई - केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर भंडारा व तिसऱ्या क्रमांकावर नाशिक जिल्हा आहे. 
         देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून घेतला. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना संपूर्ण देशभर लागू केली आहे. दर चार महिन्यांनी या योजनेचा २ हजार रुपयांचा हप्ता योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतो. मात्र केंद्र शासनाने या योजनेबाबत निर्णय घेऊन यापुढील हप्त्यांचा संबंधित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी ई - केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक केले आहे. 
       जिल्ह्यातील या योजनेसाठी पात्र असलेल्या १ लाख ८९ हजार ३७५ लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई - केवायसी पूर्ण करणे आवश्यक केले आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ३५१ शेतकऱ्यांनी ई - केवायसी पूर्ण केली आहे.१८ ऑगस्टपर्यंत ७० हजार ८६७ शेतकरी ई - केवायसी करण्यापासून दूर होते. त्यानंतर ई -केवायसीबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ३५१ शेतकऱ्यांनी ई - केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आज ८ सप्टेंबरपर्यंत केवळ २५ हजार २४ शेतकरी ई - केवायसी करण्यापासून दूर आहे.प्रलंबित शेतकऱ्यांनी ई -केवायसी करावी यासाठी गावपातळीवर शेतकरी मित्र, सामाजिक कार्यकर्ते, प्रगतिशील शेतकरी यांच्या माध्यमातून ई - केवायसी करण्यापासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांचे आधारकार्ड व संबंधित शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन सीएससी केंद्रावर जाण्यास संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मंडळाच्या लाऊडस्पीकरच्या व दवंडीच्या माध्यमातून ई -केवायसी करण्याबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.त्यामुळेच वाशिम जिल्हा पीएम किसान सन्मान निधी योजनेत ई - केवायसी करण्यात राज्यात अव्वल ठरला आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे