प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 50 हजार 88 लाभार्थी शेतकऱ्यांनी 4 सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करावी



प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

50 हजार 88 लाभार्थी शेतकऱ्यांनी 4 सप्टेंबरपर्यंत ई-केवायसी करावी

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा

         वाशिम, दि. 01 (जिमाका) : जिल्हयातील पात्र शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी ज्या 50 हजार 88 लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थीतीत येत्या 4 सप्टेंबरपर्यंत कॉमन सर्विस सेंटर (सीएससी)/ आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे आधारकार्ड व आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक घेऊन जावे व आपली ई-केवायसी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.

          आज 1 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ई-केवायसी करण्यापासून प्रलंबित असलेलया लाभार्थी शेतकऱ्यांबाबत आढावा घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. लोखंडे उपस्थित होते. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी सहभागी होते.

          ज्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल, त्यांनी उपलब्ध असलेला दुसरा मोबाईल क्रमांक ई-केवायसी करुन घेण्यासाठी घेऊन जाणे आवश्यक आहे. याशिवाय स्वतः लाभार्थ्यालाही कोणत्याही ॲन्ड्रॉईड मोबाईलवरून ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हयात १ लक्ष ८९ हजार ३४४ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यातील 50 हजार 88 लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आता 4 सप्टेंबरपर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.

          श्री. षण्मुगराजन म्हणाले, जिल्हयातील प्रलंबित असलेल्या 50 हजार 88 शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्यासाठी गावपातळीवर पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व कोतवाल यांनी संबंधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना सीएससी केंद्रावर किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर घेऊन यावे किंवा त्यांना प्रोत्साहित करावे. त्यांची ई-केवायसी करण्यासाठी मदत करावी. ॲन्ड्रॉईड मोबाईलवरुनसुध्दा ई-केवायसी करता येते. गावातील कोणताही पात्र लाभार्थी शेतकरी ई-केवायसीपासून वंचित राहणार नाही यासाठी गावपातळीवर दररोज सकाळी आणि सायंकाळी दवंडी देण्या यावी. धार्मिकस्थळावरुन तसेच गणेशोत्सव मंडळाच्या ध्वनीक्षेपकावरुन ई-केवायसी करण्यासाठी प्रलंबित शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. तसेच त्यांना ई-केवायसी करण्यासाठी मदत करावी. असे ते म्हणाले.

         4 सप्टेंबरपर्यंत प्रलंबित शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी समन्वय साधावा असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, गावपातळीवर असलेले शेतीमित्र, सामाजिक कार्यकर्ते, प्रगतीशिल शेतकरी यांच्या माध्यमातून गावात ई-केवायसी करण्यापासून कोणता शेतकरी प्रलंबित आहे का याची माहिती घेऊन त्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचून आधारकार्ड व संबंधित शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक घेऊन सीएससी केंद्रावर जाण्यास संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. असे त्यांनी सांगितले.

          श्री. हिंगे म्हणाले, ज्या गावातील शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे प्रलंबित आहे त्या शेतकऱ्यांना लाऊडस्पीकरच्या माध्यमातून व दवंडीच्या माध्यमातून माहिती देऊन त्यांना ई-केवायसी करण्यासाठी सीएससी केंद्रात जाण्यास सांगावे.

          श्री. तोटावार म्हणाले, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय यादीवरुन प्रलंबित शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना ई-केवायसी करण्यासाठी गावपातळीवरील कृषी सहायकाची मदत घेण्यास सांगावे. ई-केवायसी करण्यासाठी काही अडचणी येत असल्यास संबंधित तहलिसदार व गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे त्यांनी यावेळी सांगीतले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे