कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मालेगांव येथील शेतबांधावरील प्रयोगशाळेला भेट

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मालेगांव येथील

शेतबांधावरील प्रयोगशाळेला भेट

वाशिम, दि. 23(जिमाका) कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज 23 सप्टेंबर रोजी मालेगांव येथील मालेगांव तालुका शेतकरी उत्पादक कंपनीने सुरु केलेल्या शेतबांधावरील प्रयोगशाळेला भेट दिली. यावेळी खा. भावना गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, तहसिलदार रवी काळे, गट विकास अधिकारी श्री. काळपांडे, तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण सावंत व मालेगांव तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष डॉ. विवेक माने व सचिव ॲड. शंकर मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानव विकास मिशन व कृषी विभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्यात 13 ठिकाणी शेतबांधावरील प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहे. या प्रयोगशाळांमुळे शेतकऱ्यांच्या निविष्ठांवरील खर्चात मोठी बचत होण्यास मदत झाली आहे. या प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा, वेस्ट डिकम्पोझर, सी विड व पोटॅशीयम हुमेट बेस निविष्ठा, निम व करंज बेस निविष्ठा आणि सिलीकॉन बेस निविष्ठांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती डॉ. माने यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिली. शेतकरी उत्पादन कंपनी शेतकऱ्यांसाठी निविष्ठांची निर्मिती या प्रयोगशाळेतून करीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या निविष्ठा खरेदी खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याबद्दल मंत्री सत्तार यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हयात एरंडा, डोंगरकिन्ही, अटकळी, सावरगांव (जिरे), अडोळी, बाभूळगांव, अनसिंग, नेतनसा, वाकद, डव्हा, बेलोरा (विठोली) व मालेगांव येथे दोन ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने शेतबांधावरील प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहे. आतापर्यत या प्रयोगशाळातून तयार करण्यात आलेल्या निविष्ठांचा वापर 1277 शेतकऱ्यांनी आपल्या 4728 एकर शेतीवर केल्याची माहिती श्री. तोटावार यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिली.

यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खरीप हंगामातून सोयाबीन पिक नमुन्यांची पाहणी केली. शिरपूर येथील गजानन वानखेडे यांनी बीबीएफ पध्दतीने लागवड केलेल्या फुले संगम, मुंगळा येथील किशोर ठाकरे यांच्या पारंपारीक पध्दतीने लागवड केलेले 162, सोमठाणा येथील गजानन मापारी यांचे पारंपारीक पध्दतीने लागवड केलेले जेएस 335, शिरपूर येथील झनक साबळे यांनी सरी वरंबा पध्दतीने लागवड केलेले फुले संगम, शिरसाळा येथील संतोष इंगळे यांनी लागवड केलेले जेएस 335 चे पारंपारीक पध्दतीने लागवड केलेल्या सोयाबीन झाडाला लागलेल्या शेंगांची पाहणी केली.   

शेतकरी एकत्र येवून त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करुन शेतीच्या उपयोगात येणाऱ्या निविष्ठांची निर्मिती आपल्याच प्रयोगशाळेत करुन त्याचा प्रत्यक्ष वापर करीत आहे. त्यामुळे बाजारपेठेतून पूर्वी निविष्ठांची खरेदी होत होती, आता मात्र शेतकरीच शेत बांधावरील प्रयोगशाळेतच निविष्ठांची निर्मित्ती करुन त्याचा वापर शेतीसाठी करीत असल्यामुळे निविष्ठांच्या खरेदी खर्चात बचत होण्यास मदत झाल्याचे श्री. तोटावार यांनी यावेळी सांगीतले. कार्यक्रमाला मालेगांव तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे शेतकरी तसेच तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे