भारतीय संविधानातील मूल्यांप्रमाणे प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे कृष्णात स्वाती जादूटोणाविरोधी कायदा व चमत्कार सत्यशोधन कार्यशाळा

भारतीय संविधानातील मूल्यांप्रमाणे प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे 
                           कृष्णात स्वाती 

जादूटोणाविरोधी कायदा व चमत्कार सत्यशोधन कार्यशाळा 

वाशिम दि.२२(जिमाका) भारतीय संविधानाच्या कलम २५ मध्ये प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडीनिवडीप्रमाणे धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. देव आणि धर्माच्या बाबत संविधानाची नैतिक आणि विवेकी भूमिका आहे. भारतीय संविधानातील मूल्यांप्रमाणे प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे. असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कोल्हापूर येथील कार्यकर्ते कृष्णात स्वाती यांनी व्यक्त केले.
       २१ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथील सभागृहात सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वाशिम, जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समिती, वाशिम आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा वाशीम यांच्या संयुक्त वतीने आयोजित जादूटोणाविरोधी कायदा व चमत्कार सत्यशोधन कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री कृष्णात स्वाती बोलत होते.मार्गदर्शक म्हणून आरती नाईक(पनवेल), कार्यशाळेचे उद्घाटन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाट यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा वाशिमचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य डॉ.रामकृष्ण कालापाड, कार्याध्यक्ष तथा सदस्य पी.एस.खंदारे,डॉ. गजपाल इंगोले,सदस्य कुसुम सोनुने,महिला संरक्षण अधिकारी बी.बी.धनगर व दत्तराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
         श्री.कृष्णात स्वाती म्हणाले, १९९५ मध्ये म्हणजे २८ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात वेगवेगळ्या लोकांचे गणपती दूध प्यायला लागले.ही घटना देशात व बाहेर देशात पसरली. अलीकडच्या युवकांना ती घटना आठवत नसेल परंतु दोन महिन्यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यात नंदी दूध पिल्याची घटना ताजी आहे. गणपती किंवा नंदी दूध पिणे हा चमत्कार नाही. त्याच्यामागे विज्ञानाचा नियम आहे.धातूची कोणतीही वस्तू दूध प्राशन करू शकते. विज्ञानाच्या नियमानुसारच गणपती, नंदी नाही तर कोणतीही धातूची वस्तू दूध पिऊ शकते.यावरून महाराष्ट्रात पुढे चाललाय की मागे चाललाय असा प्रश्न सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या मनाला सातत्याने भेडसावत असल्याचे ते म्हणाले.
         श्री स्वाती पुढे म्हणाले,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ३३ वर्ष पूर्ण झाली.पुरोगामी राज्य असलेल्या महाराष्ट्राला संत नामदेव,संत तुकाराम,ज्योतिराव फुले,सावित्रीबाई फुले,छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभला आहे.आज शिक्षीत बांधव,शहरात राहणारे, मोठ्या पदावर काम करणारे,व्यावसायिक, औद्योगिक,शिक्षण व वेगवेगळ्या ठिकाणी असलेले नागरिकसुद्धा नवस करतांना आपल्याला पाहायला मिळतात.यावरून आपण प्रगत झालो की मागास आहोत हे लक्षात येते. काळ जसा पुढे जाईल शिक्षणापासून माणसे शहाणे होतील ही अपेक्षा आपण बाळगत होतो,पण आजच्या या घटनांवरून आपण मागे चाललो की काय असे वाटत आहे,असे ते म्हणाले.
       अठरा वर्षाच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघर्षानंतर जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आल्याचे सांगून श्री स्वाती म्हणाले, अमानुष व अघोरी प्रथांच्या विरोधातील हा कायदा नरेंद्र दाभोळकरांच्या बलिदानानंतर अस्तीत्वात आला.या कायद्याअंतर्गत काही हजार गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व धर्मातील बुवाबाबाबद्दल गुन्हे दाखल झाले आहे.कोणताही कायदा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीचा धर्म पाहत नाही.सर्व जाती धर्माच्या धार्मिक व देवाच्या आधारावरच शोषण करणाऱ्या लोकांच्याविरुद्ध हा कायदा काम करतो. वाशिम हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो,परंतु या जादूटोनाविरोधी कायद्याबाबतची कार्यशाळा घेऊन प्रशासनाने पुढारलेपणाचा निर्णय घेतला आहे.  या कायद्याच्या कार्यक्षेत्रात न येणाऱ्या अंधश्रद्धा समाजामध्ये आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून त्या दूर करण्यासाठी तरुणाईंने सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
         स्त्री पुरुष व तृतीयपंथी या विविध लिंगीय व्यक्तींमध्ये समता यावी, यासाठी लिंगभाव समानतेची उपक्रम अनिस राबवित असल्याचे सांगून श्री स्वाती म्हणाले, पर्यावरणाबाबतचा उपक्रमसुद्धा समिती राबवते.अनिस संघटना ही विवेकवादी आहे.मानवतावादी समाज तयार करण्याचे ध्येय उराशी बाळगून काम करीत आहे.देवाच्या आणि धर्माच्या नावाने देशात आणि जगात प्रत्येक धर्मात शोषण होते. हे शोषण थांबविणे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन होय.देव आणि धर्माच्या नावाने अंधश्रद्धा बाळगणाऱ्या किंवा शोषण करणाऱ्या फसवणूक व दिशाभूल करणाऱ्यांच्या विरोधात अनिस काम करते.शिक्षित व उच्च विद्याविभूषित लोकसुद्धा बुवाबाजीला बळी पडतात. समाजातील प्रत्येक व्यक्तिमध्ये काही ना काहीतरी अंधश्रद्धा पाहायला मिळतात.क्रोधापेक्षा करुणा आणि उपहासापेक्षा आपुलकीची आज गरज आहे.वैज्ञानिक दृष्टिकोन सोबत घेऊन समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याची आवश्यकता आहे. एखादी व्यक्ती अंधश्रद्धेची जपणूक करत असेल तर त्या व्यक्तीला अंधश्रद्धेतून बाहेर काढताना त्या व्यक्तीकडे करुणेतून बघितले पाहिजे असे ते म्हणाले. 
           श्रीमती नाईक म्हणाल्या, धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. थोर समाज सुधारकांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम अनिस करते.हाच वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी समाजातील घटकांची सुद्धा आहे.ज्योतिराव फुलेंनी त्या काळात समाज सुधारणांची सुरुवात केली. सावित्रीबाई फुलेंना देखील त्यांनी सोबत घेतले. सावित्रीबाई व ज्योतीराव फुलेंच्या समाज सुधारणांमुळेच आज मुली शिक्षण घेत आहेत.स्त्री पुरुष समानता, लिंगभाव समता हे आज वेगळ्या पद्धतीने आपण लोकांना सांगतो. जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रसार व्यापक प्रमाणात झाला पाहिजे.अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
         श्री. खडसे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्री.वाठ यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन पी एस खंदारे यांनी केले. कार्यक्रमाला विविध महाविद्यालयाचे व वसतिगृहाचे गृहपाल, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार समाज कल्याण निरीक्षक श्रीमती राठोड यांनी मानले.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण विभागाचे कर्मचारी आणि ब्रिक्स इंडिया ली.च्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे