जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पिक व योजनांच्या कर्ज प्रकरणांचा आढावा



जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला

पिक व योजनांच्या कर्ज प्रकरणांचा आढावा

       वाशिम, दि. 26 (जिमाका) : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय बँकर्सच्या सभेत खरीप पिक कर्जासह विविध महामंडळाच्या तसेच विभागाच्या योजनांच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेतला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.डी. खंबायत, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, विविध बँकाचे जिल्हा समन्वयक, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.

          श्री. षण्मुगराजन म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्ज वाटपाकडे विशेष लक्ष दयावे. अनेक बँकांनी पिक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित बँकांच्या वरिष्ठांना कळविण्यात येईल. बँकांनी बचतगटांचे खाते कागदपत्रांची पुर्तता करुन प्राधान्याने उघडावेत. विविध यंत्रणांशी संबंधित कर्ज प्रकरणे त्वरीत मंजूर होण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणा प्रमुखांनी दर आठवडयाला जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापकाकडे सभा घेऊन संबंधित कर्ज प्रकरणे मंजूर करण्याची कार्यवाही तातडीने करावी. जिल्हयातील तरुण, तरुणींना तसेच बेरोजगार व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांची कर्ज प्रकरणे एका विशिष्ट कालावधीतच मंजूर करण्यात यावी. असे ते म्हणाले.

          जिल्हा आकांक्षीत असल्यामुळे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने कर्ज प्रकरणे बँकांनी त्रृटीची पुर्तता करुन तातडीने मंजूर करावी, असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, त्यामुळे संबंधिताला उद्योग व्यवसाय वेळीच सुरु करता येईल. बँकांनी उद्योग/व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तींची दिशाभूल करु नये. ऑक्टोबरपर्यंत सर्व महामंडळांनी कर्ज प्रकरणे कोणत्याही परिस्थीतीत बँकांकडे सादर करावी. सर्व बँक शाखांनी त्यांच्याकडे आलेली कर्ज प्रकरणे तातडीने निकाली काढून जिल्हयातील तलावात मत्स्योपादनासाठी सहकारी संस्था किंवा बचतगटांसाठी स्टार स्वयंरोजगार संस्थेने प्रशिक्षणाचे आयोजन करण्याबाबतचे नियोजन करावे. सर्वच बँक खात्याशी आधार क्रमांक जोडावा. मालेगांव तालुक्यातील किन्हीराजा येथे राष्ट्रीयकृत किंवा ग्रामीण बॅंक सुरु करण्याबाबत आवश्यक ती कारवाई जिल्हा अग्रणी बँक प्रबंधकांनी करावी. असे निर्देश श्री. षण्मुगराजन यांनी यावेळी दिले.

          श्री. बारापात्रे यांनी सन 2022-23 या वर्षात 21 सप्टेंबरपर्यंत खरीप हंगामात 1200 कोटी रुपये पिक कर्ज वाटपाचे बँकाना उदिष्ट दिले असता बँकांनी 971 कोटी 87 लक्ष रुपये पिक कर्ज वाटप केले. हे कर्ज वाटप 1 लक्ष 62 हजार 02 शेतकऱ्यांना केले असून ही टक्केवारी 88.50 टक्के आहे. 30 जूनपर्यंत विविध बँकांनी 18 हजार 123 खातेदारांना 85 कोटी 81 लक्ष रुपये यावर्षी मुद्रा योजनेअंतर्गत विविध उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी वाटप केले आहे. यामध्ये शिशूगट 48 कोटी 5 लक्ष, किशोरगट 15 कोटी 74 लक्ष आणि तरुणगटात 18 कोटी 92 लक्ष रुपये वाटप केल्याची माहिती त्यांनी दिली.

          यावेळी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महात्मा फुले विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ, ओबीसी महामंडळ, नागरी जीवनोन्नती अभियान, पीएम स्वनिधी योजना यासह विविध बँकांनी आतापर्यंत कर्ज वाटप केलेल्या अन्य योजनांचाही आढावा घेण्यात आला.    

                                                                                                                                *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे