डॉ. बुधाने यांनी घेतला आकांक्षीत जिल्ह्याचा आढावा


डॉ. बुधाने यांनी घेतला आकांक्षीत जिल्ह्याचा आढावा 

वाशिम दि.(११) केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अतिरिक्त खाजगी सचिव डॉ. सचिन बुधाने यांनी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या प्रमुख उपस्थितीत १० सप्टेंबर जिल्हा नियोजन समितीच्या कक्षात आकांक्षीत वाशिम जिल्ह्याचा आढावा घेतला.
          डॉ. बुधाने म्हणाले, आकांक्षीत जिल्हा म्हणून जिल्ह्यात काही योजनांच्या अंमलबजावणीत यश आले असेल तर योजनांची देशातील उर्वरित आकांक्षीत जिल्ह्यात अंमलबजावणी करता येईल.जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योजना प्रभावीपणे राबवाव्यात.जिल्ह्यातील शेतकरी हा केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता त्यांना इतरही नगदी पिकाकडे वळविण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा.अशी सूचना श्री. बुधाने यांनी यावेळी केली. 
         जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी वाशिमचा समावेश आकांक्षीत जिल्हा म्हणून सन २०१८ मध्ये केंद्र सरकारने केल्याचे सांगून ते म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य व पोषण,कृषी व जलसंधारण,शिक्षण व कौशल्य विकास आणि मूलभूत सुविधा या बाबींवर आकांक्षीत जिल्हा म्हणून नीती आयोगाचे लक्ष आहे.आकांक्षीत जिल्हा म्हणून जिल्ह्याने विविध बाबींमध्ये प्रगती केल्याने यापूर्वी केंद्र सरकारकडून अनुक्रमे दहा कोटी, पाच कोटी आणि तीन कोटी रुपये जिल्ह्याला बक्षीस म्हणून मिळाल्याचे श्री.षण्मुगराजन यांनी सांगितले. 
           आरोग्य क्षेत्रात गरोदर मातांची नोंदणी,लसीकरण,त्यांची हिमोग्लोबिन तपासणी,नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये जिल्ह्याने केलेले काम, गरोदर मातांना आरोग्यविषयक सुविधा,संस्थेमध्येच बाळंतपण,गरोदर मातांशी थेट संपर्क,क्षय रुग्णांचे फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून एक्स - रे काढणे व तपासणी, मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोरे यांनी दिली. 
        जिल्ह्यात बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी बालकांच्या आहाराकडे विशेष लक्ष असून त्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते.विविध विभाग प्रमुखांना कुपोषित बालके दत्तक दिले असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे श्री.जोल्हे यांनी सांगितले.
           जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनाचे प्रमाण १४ टक्क्यांवरून ४८ टक्के झाले असून हळदीचे व फळबाग क्षेत्र वाढले आहे.सोयाबीन पेरणीत जिल्ह्याचा अष्टसूत्रीचा प्रयोगाचे  अनुकरण बाहेर जिल्ह्यात व बाहेर राज्यात करण्यात येत आहे.मागील तीन वर्षापासून शेतकरीच घरीच बीज प्रक्रिया करीत आहे.जिल्ह्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत असल्याची माहिती कृषी अधीक्षक श्री तोटावार यांनी यावेळी दिली.
          या सभेला जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज,मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर,बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जोल्हे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री खंबायत, जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी,मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.वानखेडे,जिल्हा अग्रणी प्रबंधक दिनेश बारापात्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ.विनोद वानखडे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री खारोडे यांच्यासह इतरही विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे