जिल्हा कृती दल समितीची सभा संपन्न

जिल्हा कृती दल समितीची सभा संपन्न

       वाशिम, दि. 27 (जिमाका) : जिल्हयात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना तसेच विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने आज 27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली वाकाटक सभागृहात मिशन वात्सल्य समितीअंतर्गत जिल्हा कृती दल समितीची सभा संपन्न झाली. या सभेला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. अलका मकासरे, सदस्य डॉ. मंजुश्री जांभरुणकर, विनोद पट्टेबहादूर, बालाजी गंगावणे, ॲड. अनिल उंडाळ, प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रियंका गवळी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी) मिनाक्षी भस्मे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी व सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांची उपस्थिती होती.

           श्री. षण्मुगराजन म्हणाले, कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना व विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही यंत्रणांनी करावी. विधवा महिलांना बचतगटात सामावून घ्यावे. ज्या महिलांना कौशल्यविषयक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, त्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे. शासकीय व निमशासकीय सेवेतील ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही संबंधित विभागाने करावी. कोविडमुळे मृत्यू झालेली व्यक्ती घरकुलासाठी पात्र असेल तर त्याच्या वारसांना घरकुल योजनेचा लाभ दयावा. पशुसंवर्धन, शिक्षण आणि कृषी विभागाच्या योजनांचा देखील लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. ज्या विधवा महिला रोहयोचे जॉबकार्ड मिळण्यास पात्र आहे त्यांना ते जॉबकार्ड देण्यात यावे. असे ते म्हणाले.

           कोविडमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या मुलांच्या घरी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व शिक्षकांनी भेटी देऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही याकडे लक्ष दयावे. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, विधवा महिलांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम कसे करता येईल याचे नियोजन करावे. सर्व विधवा महिलांचे बँक खाते उघडण्यात यावे. त्यामुळे त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करतांना अडचण येणार नाही. असे त्यांनी सांगितले.

           श्रीमती गवळी यांनी कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून देण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्हयातील 161 बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. जिल्हयातील 218 बालकांपैकी 161 बालकांना प्रति बालक 10 हजार रुपये इतका बाल न्याय निधी वितरीत करण्यात आला आहे. 29 बालकांना अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे. अनाथ झालेल्या 4 बालकांपैकी 2 बालकांचे कायदेशिर पालकत्व घोषित करण्यात आले असून त्यांची मालमत्ता हक्क वारसाने प्राप्त करुन देण्यात आले असल्याची माहिती श्रीमती गवळी यांनी दिली. तसेच विविध विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी दिली.     

                                                                                                                                 *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे