लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयातील 1 लक्ष 65 हजार गुरांचे लसीकरण



लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

जिल्हयातील 1 लक्ष 65 हजार गुरांचे लसीकरण

· आतापर्यंत 13 जनावरांचा मृत्यू

· 45 गावातील 352 गुरे बाधित

· 160 गुरे उपचारातून बरी 179 गुरांवर उपचार सुरु

       वाशिम, दि. 29 (जिमाका) : जिल्हयातील एकूण 1 लक्ष 68 हजार 91 पशुधन असून त्यापैकी आजपर्यंत 1 लक्ष 65 हजार 616 गुरांचे लम्पी प्रतीबंधक लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हयात सर्व सहाही तालुक्यात आतापर्यंत 45 गावातील 352 गुरांना लम्पी चर्मरोगाची बाधा झाली. त्यापैकी 13 जनावरांचा लम्पी चर्मरोगाने मृत्यू झाला. लम्पी चर्मरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी शासन प्रशासनाकडून प्रभावी उपायोजना करण्यात येत आहे. जिल्हयात आतापर्यंत औषधोपचारातून 160 गुरे बरी झाली असून 179 गुरांवर उपचार सुरु आहे. जिल्हयातील ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून तसेच पशुसंवर्धन विभागाने देखील गुरांचे लसीकरण केले.

          जिल्हयातील 45 गावातील 352 गुरे लम्पी बाधित आढळून आल्याने या गावांच्या 5 किलोमीटर परिघातील 203 गावातील गुरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण तातडीने करण्यात आले. जिल्हयात लम्पी त्वचारोगाचा संसर्ग अन्य जनावरांना होवू नये यासाठी जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी तातडीने लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्याचे निर्देश दिल्याने जिल्हयात मोठया प्रमाणात गुरांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे या रोगाचा जिल्हयात संसर्ग रोखण्यास मोठया प्रमाणात मदत झाली.

          ज्या अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गुरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे, त्यांनाच राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार मदत दिली जाणार आहे. लम्पीमुळे मृत्यु पावलेल्या गायीच्या पालनकर्त्याला 30 हजार रुपये, बैलाच्या पालनकर्त्याला 25 हजार रुपये आणि गोऱ्याचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या पालनकर्त्याला 16 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. ज्या पशुपालकांची गुरे लम्पीने बाधित आहे, त्या बाधित जनावरांवर उपचारासाठी येणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पशुपालकांनी सहकार्य करावे व आपली गुरे लसीकरण व औषधोपचारातून लम्पी रोगमुक्त करावी. तसेच ज्या पशुपालकांनी अद्यापही आपल्या गुरांना लम्पी प्रतिबंधक लस दिलेली नाही, त्यांनी आपल्या गुरांना लस दयावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन समिती सभापती डॉ. श्याम गाभणे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे